बॉलीवूड अभिनेते दिवंगत शशी कपूर यांचा आज जन्मदिवस. १८ मार्च १९३८ ला कलकत्त्यामध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांनी बॉलीवूडला अनेक सुपरहिट हिंदी सिनेमे दिले. शशी कपूर हे त्यांच्या कामासोबतच त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही कायम चर्चेत असायचे. १९५८ साली त्यांनी जेनिफर केंडल यांच्याशी लग्न केलं.

त्याबद्दलचे काही किस्से बऱ्याच लोकांना कदाचित माहित नसतील. जेनिफर यांची लहान बहीण फैलिसिटी हिने आपल्या व्हाईट कार्गो या पुस्तकात या दोघांच्या लव्हस्टोरीबद्दल काही गोष्टी लिहिल्या होत्या. त्यांनी लिहिलं होतं, “जेनिफर आपल्या एका मित्रासोबत ओपेरा हाऊस इथं नाटक पाहायला गेली होती. तेव्हा शशी यांनी तिला पाहिलं आणि बघताक्षणी तिच्या प्रेमात पडले. तेव्हा शशी कपूर एवढे प्रसिद्ध नव्हते त्यामुळे त्यांची ओळख व्हायला वेळ लागला.”

शशी कपूर यांनीही आपल्या एका पुस्तकात जेनिफर यांच्याविषयी लिहिलं आहे. ते म्हणतात, “मी जेनिफरची बरीच नाटकं पाहिली. पण तिने माझ्याकडे कधी लक्षच दिलं नाही. काही दिवसांनंतर तिने मला एकदा सांगितलं की मी मुंबईमध्येच राहते आणि आपण भेटू शकतो.” त्यानंतर शशी आणि जेनिफर भेटू लागले. जेनिफर या शशी यांच्यापेक्षा ५ वर्षांनी मोठ्या होत्या. शशी कपूर यांनी असंही लिहिलं आहे की, त्यांच्यासोबत वेळ घालवायला मिळावा म्हणून शशी मुंबई लोकलमधून प्रवास करत असताना एक स्टेशन पुढे उतरायचे.

अजून एक किस्सा म्हणजे त्या दिवसात म्हणजे शशी टीनएजर असताना, ते इतके लाजाळू होते की, जेनिफर यांच्याशी बोलतानाही ते फार लाजायचे आणि त्यामुळे झालं काय की जेनिफर या त्यांना ‘गे’ समजू लागल्या होत्या. शशी लिहितात, “जेनिफरने मला नंतर सांगितलं की तिला मी गे वाटायचो. पण परिस्थिती नंतर बदलत गेली, आणि मग आमचं प्रेम लग्नापर्यंत पोहोचलं.”