गायत्री हसबनीस

अमिताभ बच्चन यांनी गाजवलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या शोच्या मराठी अवतारातही चक्क अमिताभ यांच्या हॉट सीटवर बसून शो करण्याची संधीही त्यांना मिळाली. स्वप्नवत वाटाव्यात अशा गोष्टी आज मेहनतीतून प्रत्यक्षात नागराज मंजुळेंनी साकार केल्या आहेत. मंजुळेंनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटात अमिताभ बच्चन यांना पाहणे ही  मराठी प्रेक्षकासाठी अभिमानाचीच बाब आहे. बिग बींना ‘झुंड’साठी गाठणे आणि चित्रपटाला त्यांनी होकार देत गोष्टी पुढे सरकणे ते थेट आता प्रेक्षकांसमोर लवकरच चित्रपट प्रदर्शित होणे यापेक्षा विस्मयकारक काही नाही, असे नागराज मंजुळे यांनी ‘लोकसत्ता’शी गप्पा मारताना सांगितले.   

आज चित्रपट या माध्यमातून एक तरुण आपल्या स्वभावाला अनुसरून स्वत:चे म्हणणे समाजापर्यंत पोहोचवतो आहे. याच माध्यमात आपली यशस्वी ओळख निर्माण केल्यानंतर लहानपणापासून ज्यांचे चित्रपट पाहण्यासाठी झगडत होतो त्याच कलाकाराला घेऊन चित्रपट करणे हा प्रवासच तरुणाईला प्रेरणा देणारा आहे. मराठीत यशस्वी ठरल्यानंतर अमिताभ बच्चन यांच्याबरोबर चित्रपट करत हिंदूीत पुढचे पाऊल टाकणाऱ्या नागराज मंजूळे यांची कथाच वेगळी..

नागराज अमिताभना घेऊन हिंदूीत चित्रपट करत आहेत ही वार्ता ऐकल्यापासूनच जनमानसात या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली होती. मात्र करोनामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणात आणि मग प्रदर्शनात अडथळे येतच राहिले. आता सगळय़ा अडचणी पार होऊन ४ मार्चला ‘झुंड’ हा चित्रपट चित्रपटगृहात दाखल होतो आहे.  ‘सैराट’चा हिंदूी रिमेक ‘धडक’ जेव्हा चार वर्षांपूर्वी आला तेव्हाच नागराज मंजुळे यांचे नाव खऱ्या अर्थाने बॉलीवूडमध्ये अभिमानाने गणले गेले तरीही त्याआधी ‘सैराट’ या चित्रपटाने इतिहास घडवला होता आणि संपूर्ण देशाला या चित्रपटाकडे खेचून आणण्याचे सामर्थ्य साकारत या मराठी चित्रपटाने पहिल्यांदाच शंभर कोटींचा गल्ला पूर्ण केला. ‘पिस्तूल्या’ या आपल्या लघुपटापासून ‘फॅन्ड्री’ या सामजिक आशयाच्या चित्रपटानंतर मात्र नागराज यांची घौडदौड जोमाने सुरू झाली. नंतर ‘सैराट’, ‘नाळ’, ‘पावसाचा निबंध’, ‘अनपॉज्ड: नया सफर’ आणि आता अमिताभ बच्चन यांना घेऊन केलेला ‘झुंड.. हा प्रवास यापुढेही असाच वेगात सुरू राहणार आहे. मात्र कितीही यशस्वी ठरले तरी त्यांचा मूळचा मनमिळाऊ स्वभाव अजूनही तसाच आहे यात शंका नाही.     

अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे समीकरण जुळून आले ते ‘झुंड’ या कथेमुळेच. ही कथा नागराज मंजुळे यांच्या कल्पनेतून साकार झालेली असल्याने या कथेतील विजय बरसे यांची भूमिका केवळ अमिताभ बच्चनच करू शकतात हे त्यांच्या मनाने घेतले होते. या सुखद विचाराने नागराज यांनी अमिताभ बच्चन यांना गाठले आणि तयार झालेली गोष्ट  ऐकवली जी त्यांना मनापासून भावली, आवडली आणि त्यांनी आपला होकार दिला असे नागराज मंजुळे यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले. ‘‘साक्षात बच्चन यांना घेऊन चित्रपट करावा अशी कल्पना माझ्याकडे निर्मात्यांनी आणली होती. ही कल्पना प्रत्यक्षात कशी आणता येईल, यावर विचार करत काम करण्यासाठी मी साधारण तीन ते चार महिने वेळ घेतला. अमिताभ यांना मुख्य भूमिकेत घेऊन ही गोष्ट तयार करता येईल, चित्रपट करता येईल असा आत्मविश्वास वाटला. त्यानंतर अर्थात ही कथा मूळ झोपडपट्टीतल्या किशोरवयीन मुलांभोवती फिरणारी असल्याने त्या मुलांची निवड, पाश्र्वसंगीत आणि गाणी यांवर काम करायला सुरुवात केली’’, अशी माहिती नागराज मंजुळे यांनी दिली.

 मी सर्वसामान्यांसह म्हणजे अभिनयाची काहीच माहिती नसलेल्यांना घेऊन याआधी चित्रपट केले आहेत. आता तर एका दिग्गज अभिनेत्यासोबत काम करण्याची ही माझी पहिलीच वेळ होती. एकतर लहानपणापासून त्यांना बघत बघत मी मोठा झालो आहे तेव्हा त्यांच्यासह एकत्र काम करण्याची संधी मला मिळाली हे समजून घेतानाच पहिल्यांदा अविश्वसनीय वाटले. त्यातून हीच भावना कायम होती की आपण त्यांच्यासोबत जे काही साकार करू ते सर्वोत्तमच असायला हवे आणि याच जाणिवेतून ‘झुंड’ साकार झाला आहे, असे नागराज यांनी सांगितले. ‘झुंड’ ही कथा एका निवृत्त क्रीडा प्राध्यापकाची असून झोपडपट्टीतल्या मुलांना सॉकर खेळ खेळण्यासाठी तो कशी चळवळ राबवतो यावर बेतलेली ही कथा असावी असे आत्तापर्यंत समजते, त्यामुळे नागराज यांनी या किशोरवयीन मुलांची निवड कशी केली याबद्दलही माहिती दिली. ‘‘नागपूरच्या भागातील ही मुलं आहे. त्यांची निवड करण्यासाठी माझा भाऊ आणि एक मित्र नागपूरला गेले. साधारण महिना, दोन महिना ते तिथे होते आणि तेथून मग त्यांचे फोटो, माहिती आणि नंबर ते पाठवायचे. अशा खूप मुलांची माहिती माझ्यापर्यंत आली आणि तशी मी निवड करत गेलो’’, अशी माहिती त्यांनी दिली. हिंदूी म्हणा, मराठी म्हणा किंवा कुठलाही प्रादेशिक चित्रपट पाहिला तर आजच्या घडीला अनेक आशयाचे चित्रपट या दृक्-श्राव्य माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यातून स्वत:ची भूमिकाही एक सर्जनशील कलाकार म्हणून नेहमीच बुद्धिबळातल्या वजीराप्रमाणे सर्वव्यापी तरी वेगळी राहिली आहे, असे ते म्हणतात. ‘‘मी या क्षेत्रात आलो ते स्वत:चे असे अनुभव आणि म्हणणे घेऊनच, समाजातला असा एक वर्ग आहे ज्यांच्याबद्दल इतरांना काहीच माहिती नव्हती. त्यांची व्यथा, त्यांचे अस्तित्व मी समाजापुढे रुपेरी पडद्यावरून घेऊन आलो. चित्रपटसृष्टीत या मोजक्या आणि न परिचित असणाऱ्या कथा लोकांपर्यंत माझ्यातर्फे पोहोचल्या आणि ज्यावर लोकांनी भरपूर प्रेम केले. अशा या नवनव्या कथा रचणाऱ्यांच्या चित्रपटक्षेत्रातील सुवर्ण काळाचा मी भाग आहे याचा मला विशेष आनंद वेळोवेळी वाटतो’’, असेही त्यांनी सांगितले. 

 भारतीय प्रेक्षकांना माहितीही आहे आणि अपेक्षितही आहे की मी ‘झुंड’ हा चित्रपट करतोय म्हणजेच काहीतरी वेगळं करतोय. मलाही नेहमीच वाटतं की आपल्या मनाला जे वाटतं, पटतं त्यातून चित्रपट करायला पाहिजे आणि याच जाणिवेने अन् हेतूने मी हा चित्रपट केला आहे. मग ती कलाकृती पहिल्यासारखी आहे का, याची चाचपणी करण्यापेक्षा नव्या कलाकृतीला स्वतंत्रपणेच पाहिले पाहिजे. त्यातून मला खात्री आहे की हा चित्रपटही खूप उत्तम झाला आहे ज्याद्वारे मी सर्वतोपरी चांगले काहीतरी मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

 नागराज मंजुळे

अमिताभ बच्चन हे किती अष्टपैलू अभिनेते आहेत हे सर्वज्ञात आहेच. त्यांनी रंगवलेली कुठलीही भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहील  अशी असते. ‘झुंड’च्या निमित्ताने त्यांच्या नायक या प्रतिमेला सहजरीत्या समजून घेत या चित्रपटातूनही त्यांची भूमिका कशी रेखाटली यावर विस्तृतपणे बोलताना नागराज यांनी सांगितले, ‘‘खरंतर या व्यक्तिरेखेचे वय आणि त्या पात्राचा एकूण आब पाहता तो अमिताभ यांना साजेसाच होता. शिवाय, आपल्या अभिनयातून ते त्यांच्या वाटय़ाला आलेली व्यक्तिरेखा वेगळय़ाच उंचीवर नेऊन ठेवतात हे त्यांचे वैशिष्टय़. त्यामुळे त्यांच्याशिवाय ही भूमिका दुसरं कोणी करेल अशा शंकेलाही जागाच नव्हती’’. आपल्यासमवेत या दिग्गज अभिनेत्याला नव्या धाटणीसह, शैलीसह पुढे घेऊन जाताना काही वेगळे प्रयोग करावे लागले का, यासंदर्भात बोलताना कथेच्या मांडणीवर एक लेखक-दिग्दर्शक म्हणून अधिक भर देत रंगभूषेचा अतिरेक केला नाही, असे उत्तर नागराज यांनी दिले. ते म्हणतात, ‘‘सर्जनशीलता म्हणून जे काही आवश्यक आहे. त्यात नवं काहीतरी शोधत राहणं आणि त्यावर प्रयोगांती नवीन आत्मसात करणं हे मी ‘झुंड’च्या निमित्ताने अनुभवलं आहे. अमिताभ बच्चन यांची रंगभूषाही मी साधीच ठेवली’’.