दरवर्षी मराठी चित्रपटाने नव्या वर्षांची सुरूवात होणे हा जणू पायंडाच पडून गेला आहे. याहीवर्षी गेल्यावर्षी सुरू झालेली ‘दंगल’ कायम असताना मराठीने पुन्हा एकदा शुभारंभ करायचा निर्णय घेतला आहे. ‘पहिल्या प्रेमाचा दुसरा पार्ट’ असे घोषवाक्य घेऊन आलेला ‘ती सध्या काय करते’ हा झी स्टुडिओजचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सतीश राजवाडे यांच्या दिग्दर्शनातील नवी प्रेमकथा, अंकुश चौधरीचा नवा लुक, अंकुश आणि तेजश्री प्रधान अशी नवी फ्रेश जोडी, मराठीतील सुपरस्टार लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनय बेर्डे आणि जिला आजवर गायिका म्हणून पाहत आलो आहोत त्या आर्या आंबेकरचा चित्रपट प्रवेश अशा वेगवेगळ्या गोष्टींची एक हळूवार, संगीतमय भट्टी जमवून आलेला हा चित्रपट या वर्षांची यशस्वी सुरूवात ठरणार का?, ही उत्सूकता आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ‘रविवार वृत्तांत’शी साधलेला हा खास संवाद..

वर्षांरंभाची मोठी जबाबदारी

जगातील प्रत्येक व्यक्ती कधी ना कधीतरी प्रेमात पडलेली असते. आणि मग त्या न्यायाने पहिलं प्रेम हा प्रत्येकासाठीच खास कप्पा असतो. तो विसरता येत नाही. कधीतरी आयुष्याच्या एका टप्प्यावर मग पहिल्या प्रेमातील आपली ‘ती’ किंवा ‘तो’ सध्या काय करतो?, हा प्रश्नही साहजिकच प्रत्येकाला पडतो. खरंतर हे एक वाक्य असं आहे ज्यामागे कित्येक अध्याय लिहिले जातील, इतका खोल अर्थ दडलेला आहे. त्यामुळे खरोखरचा या उत्सूतकतेतूनच ‘ती सध्या काय करते’चा जन्म झाला. आणि वर्षांची सुरूवात ही आपल्या या प्रेमकथेने होते आहे, म्हटल्यावर खरं म्हणजे उत्सूकता जशी आहे तसंच एक जबाबदारीची जाणीवही मनात घर करून आहे, अशी भावना दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी व्यक्त केली. या चित्रपटाची कल्पना ही सहज आपल्याच मित्रांमधल्या कधीकाळाने रंगलेल्या गप्पा आणि त्यातून मग ‘हा काय करतो, तो काय करतो’अशा चर्चेतूनच जन्माला आली असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र ही कथाकल्पना कित्येक दिवसांपूर्वी ‘झी स्टुडिओड’च्या निखिल साने यांना ऐकवली होती. त्यावर मग चर्चा सुरू झाली. मनस्विनी लता रवींद्र हिचा पटकथाकार म्हणून प्रवेश झाला. आज हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येतो आहे, असे त्यांनी सांगितले. लोकांना नेहमीच वेगळी जोडी पहायला आवडते. याआधीही मुक्ता बर्वे -स्वप्नील जोशी आणि अतुल कुलकर्णी- सागरिका घाटगे अशी नवी जोडी माझ्या चित्रपटांतून प्रेक्षकांनी पाहिली होती. त्यामुळे यावेळीही अशी एक वेगळी जोडी आणण्याचा प्रयत्न होता जो अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान यांच्याबरोबर साध्य झाला आहे. तीच गोष्ट अभिनय आणि आर्याची आहे. या दोघांच्याही रितसर ऑडिशन्स झाल्या असल्याची माहिती त्यांनी दिली. आत्तापर्यंत आपण वेगवेगळे जॉनर चित्रपटांमधून हाताळले आहेत. त्यात रहस्यपट आहे, ‘एक डाव धोबी पछाड’सारखा विनोदी चित्रपटही आहे. मात्र प्रेमकथा पुन्हा पुन्हा पाहणारा मोठा प्रेक्षकवर्ग असतो. मला स्वत:ला वेगवेगळ्या स्वरूपात प्रेमकथा हाताळायला आवडतात. ‘ती सध्या काय करते’ही सुध्दा संवादातून फु लत जाणारी अशी एक वेगळी प्रेमकथा असल्याचे त्यांनी सांगितले.   –  सतीश राजवाडे

प्रत्येकाला जोडून घेणारा असा हा चित्रपट

‘ती सध्या काय करते’ या चित्रपटाचं वाचन करत असतानाचे अनुभव सांगावेसे वाटतात. या चित्रपटाविषयी जेव्हा जेव्हा चर्चा झाली किंवा एखाद्याला जेव्हा आम्ही कथा ऐकवली तेव्हा ती ऐकल्यानंतर प्रत्येकजण आपली कथा सांगायला सुरूवात करायचा. त्यामुळे प्रत्येकाला जोडून घेणारा, अतिशय सुंदर, आठवणीत रमायला लावणारा असा चित्रपट आहे. आपण ज्याच्या प्रेमात होतो ती व्यक्ती सध्या काय करते?, हा प्रश्न तिलाही पडतो आणि त्यालाही पडतो. कित्येकदा माणूस म्हणून लक्षात राहण्यापेक्षा आपण त्यांच्या आठवणींमध्ये जास्त रमतो. एका टप्प्यावर थांबून आपण जेव्हा त्या आठवणींचा विचार करतो तेव्हा आपण शुध्द, निखळ प्रेमाचाच विचार करत असतो. गेल्यावर्षी मी दोन-तीन चित्रपट केले. प्रत्येक चित्रपटात माझा वेगळा लुक होता. इथे मी अनुरागची भूमिका करतो आहे, जो आर्किटेक्चर आहे. घरातला चांगला कमावता मुलगा आहे. शिवाय, अनुरागच्या वयाचे तीन टप्पेही यात असल्याने लहानपणापासूनचा अनुभवही त्याच्या तरूण व्यक्तिरेखेशी जोडला गेलेला आहे. ही प्रत्येक गोष्ट लक्षात घेऊन माझा लुक तयार करायचा होता. त्यामुळे आम्ही १०-१२ वेगवेगळे लुक्स करून पाहिले. तेव्हा कुठे माझा आत्ताचा चित्रपटातला लुक मला मिळाला आहे. हा चित्रपट म्हणजेच एखादी नवीन कादंबरी वाचायला घ्यावी, असा अनुभव होता. मनस्विनीची वेगळी गोष्ट, तिची पात्रं, तेजश्रीबरोबर पहिल्यांदा काम करत असल्याने तिच्याशी नव्याने झालेली ओळख, सतीशचे दिग्दर्शन खरोखरच एका नव्या जगात प्रवेश केल्यासारखाच हा अनुभव होता.  अंकुश चौधरी

अंकुशसारख्या तोडीच्या अभिनेत्याबरोबर तितकेच चांगले काम करता आलेमालिके तून ‘जान्हवी’ म्हणून लोकप्रिय झाल्यानंतर आपला प्रत्येक प्रोजेक्ट विचारपूर्वक निवडणाऱ्या तेजश्रीचा हा मोठा चित्रपट आहे. सतीश राजवाडे यांचं दिग्दर्शन असलेला चित्रपट आहे. प्रेमकथा तीही मनस्विनीची, ‘झी स्टुडिओ’चा नव्या वर्षांचा पहिला चित्रपट जो हमखास यशस्वी होतोच असं म्हणतात. इतक्या सगळया जमेच्या बाजू असलेला हा चित्रपट माझ्यासाठी यावर्षीचा खूप महत्वाचा चित्रपट आहे. एखाद्या चांगल्या अभिनेत्याबरोबर जेव्हा तुम्हाला काम करण्याची संधी मिळते तेव्हा एका छान साद-प्रतिसाद स्वरूपात अभिनयाची जुगलबंदी करण्याची संधी एक कलाकार म्हणून मिळते. मला या चित्रपटाच्या निमित्ताने अंकुशसारख्या तोडीच्या अभिनेत्याबरोबर काम करण्याचा खूपच चांगला अनुभव मिळाला आहे. दुसरं या चित्रपटाच्या बाबतीत महत्वाचं म्हणजे प्रेमकथा म्हटली की ती रोमिओ-ज्युलिएटसारखंच प्रेम करणारी असायला हवी असं नाही. आयुष्यात एका वळणावर तुम्हाला सोडून गेलेली तुमची मैत्रीण, मित्र किंवा खूप जवळची व्यक्तीही इतक्या वर्षांनंतर सध्या काय करते आहे हा प्रश्न तुम्हाआम्हाला सतावू शकतो. त्याअर्थाने, प्रत्येकालाच या अनुभवाशी जोडून घेणारा असा हा चित्रपट आहे.   तेजश्री प्रधान

मोठा अभिनेता बनण्याचे स्वप्न आहे

लहानपणापासूनच मला अभिनयाची आवड होती. चित्रपटाचे दिग्दर्शक सतीश राजवाडे व सुहास गुजराथी यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्यांच्यासोबत काम करणे हे माझे भाग्य समजतो. तसेच तेजश्री प्रधान व अंकुश चौधरी यांच्यासोबत सेटवर जरी गमती करायला मिळाल्या नसल्या तरी चित्रपटाच्या प्रमोशनच्या दिवशी आम्ही खूप धमाल करतो. पुढे जाऊन अनेक चित्रपट करायचे आहेत. प्रेक्षकही चित्रपटाला चांगला प्रतिसाद देतील अशी आशा बाळगतो. पुढे जाऊन चित्रपटातील मोठा अभिनेता बनायचे माझे स्वप्न आहे त्यासाठी मी प्रयत्न करणार.   अभिनय बेर्डे