बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉनने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. क्रितीने ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता टायगर श्रॉफने मुख्य भूमिका साकारली होती. आता पुन्हा एकदा टायगर आणि क्रिती ही जोडी एकत्र काम करताना दिसणार आहे. तब्बल सहा वर्षांनंतर टायगर आणि क्रितीचा ‘गणपत’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गणपत’ चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.

हे मोशन पोस्टर टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये क्रिती बाइकवर बसलेली आहे. तर टायगर बोलतो “माझी लव्ह स्टोरी इथून सुरू झाली.” मोशन पोस्टर शेअर करत टायगरने कॅप्शन दिले आहे की, “प्रतिक्षा संपली, या प्रतिभावान अभिनेत्रीसोबत पुन्हा एकदा काम करण्यासाठी उत्सुक आहे.” मोशन पोस्टरमध्ये क्रितीचा हटके लूक दिसत आहे. तिच्या या लूकची चाहते खूप प्रशंसा करत आहेत.

या आधी देखीन टायगरने ‘गणपत’ चित्रपटाचे एक मोशन पोस्टर शेअर केले होते. या पोस्टरमध्ये एक मुलगी बाइकवर बसल्याचे दिसत आहे. त्यावर अनेक चाहत्यांनी कमेंट करत वेगवेगळ्या अभिनेत्रींची नाव घेतली होती. त्यात अभिनेत्री सारा अली खान, नोरा फतेही आणि क्रिती सेनॉनचे नाव घेतले होते. पण आता ती अभिनेत्री क्रिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

क्रिती आणि टायगरला पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. क्रिती आणि टायगर या दोघांनी ‘हीरोपंती’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आता त्यांचा ‘गणपत’ हा चित्रपट येणार आहे. या व्यतिरिक्त क्रिती ‘बच्चन पांडे’ या चित्रपटात दिसणार आहे. यात तिच्यासोबत अभिनेता अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे.