Jennifer Mistry Allegations on Asit Modi : ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा टीव्ही जगतातील सर्वात लोकप्रिय शो आहे. हा शो गेल्या दशकाहून अधिक काळ लोकांचे मनोरंजन करत आहे. परंतु, अनेक कारणांमुळे हा शो वादातही सापडला आहे.
दरम्यान, मिसेस सोढी भूमिका साकारणाऱ्या जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्माते असित कुमार मोदी यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत.
पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत, जेनिफर मिस्त्रीने ज्या घटनांमुळे असित मोदींवर लैंगिक छळाचा आरोप केला होता, त्याबद्दल उघडपणे सांगितले. जेनिफरने २०१८ मध्ये शोचे ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याशी झालेल्या तिच्या वादाची आठवण करून दिली. तिने दावा केला की, सोहेलने फोनवर तिच्याशी गैरवर्तन केले. या घटनेने दुखावलेल्या तिने असित मोदींची मदत घेण्याचा निर्णय घेतला. परंतु पाठिंबा मिळण्याऐवजी असित मोदींनी तिच्याशी अयोग्य वर्तन केले.
जेनिफर मिस्त्रीने असित मोदींवर आरोप केले
जेनिफर मिस्त्री म्हणाली, ‘मी असितजींकडे माझ्या आणि सोहेलमधील समस्येबद्दल बोलण्यासाठी गेले होते होते, पण त्यांनी मला सांगितले की तू सेक्सी दिसत आहेस.’ जेनिफरने २०२२ मधील आणखी एका घटनेचा उल्लेख केला, जेव्हा तिने स्वित्झर्लंडला जाण्यासाठी व्हिसा लेटर मागितले होते. फोन संभाषणादरम्यान ती रडू लागली. मग तिच्या म्हणण्यानुसार, असित मोदी म्हणाले, तू का रडत आहेस? जर तू इथे असतीस तर मी तुला मिठी मारली असती. मी नक्कीच संधी घेतली असती. तुला माझी अजिबात पर्वा नाही.”
अभिनेत्रीने २०१९ मध्ये सिंगापूरमध्ये शूटिंगदरम्यान घडलेल्या घटनेचाही खुलासा केला. ती म्हणाली, “आम्ही ८ मार्च २०१९ रोजी शूटिंग करत होतो. ते माझ्याकडे आले आणि म्हणाले की, तुझा रूममेट दररोज बाहेर जातो. तू माझ्या खोलीत येऊन व्हिस्की का पित नाहीस? तुला एकटेपणाचा कंटाळा येईल.”
जेनिफर म्हणाली की, सुरुवातीला तिने अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला, पण नंतर तिला परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले. त्याच सिंगापूर ट्रिपदरम्यान, एका कॉफी शॉपमध्ये आणखी एक त्रासदायक घटना घडली. जेनिफरच्या म्हणण्यानुसार, असित मोदी तिच्या खूप जवळ आले आणि म्हणाले, ‘तुझे ओठ खूप सेक्सी आहेत, मला तुला धरून किस करावेसे वाटते. हे ऐकून मला खूप भीती वाटली. माझे हातपाय थंड पडले होते.”
जेनिफरने पुढे दावा केला की, असित मोदी तिची सहकलाकार मोनिका भदोरियाशीही अयोग्य बोलले होते. अभिनेत्री म्हणाली, ‘त्यांनी मोनिकाला विचारले की तुझे किती बॉयफ्रेंड आहेत?’ जेनिफरने खुलासा केला की, तिने तिचा सहकलाकार मंदार चांदवडकरलाही असित मोदींच्या कृतींबद्दल सांगितले होते, परंतु त्याने अभिनेत्रीची बाजू घेतली नाही.