कलाविश्वात काम करताना अनेक कलाकारांना चांगल्या-वाईट प्रसंगांना सामोरे जावे लागत असते. अभिनेत्रींच्या वाटेला येणारे असे वाईट प्रसंगच अधिक असतात. त्याबद्दल अनेक अभिनेत्री आता पुढे येऊन मुलाखतींमधून त्यांच्याबरोबर घडलेले प्रसंग सांगतात. अशातच बॉलीवूडमधील एका लोकप्रिय अभिनेत्रीने तिच्याबरोबर घडलेला वाईट प्रसंग सांगितला आहे.
आम्ही बोलत आहोत ‘जय हो’फेम डेझी शाहबद्दल. ती सध्या तिच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आहे. या मुलाखतीदरम्यान तिने अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. ती सलमान खानबद्दलही बोलली. अभिनेत्रीने छेडछाडीच्या घटनेचाही उल्लेख केला आहे, जी मुंबईजवळील डोंबिवली आणि जयपूर येथे घडली. तिने या अनुभवाबद्दल उघडपणे सांगितले आहे.
डेझी शाहने ‘हटरफ्लाय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तिचा जन्म व वाढ डोंबिवलीत झाली आणि त्याच परिसरात तिची छेडछाड काढली गेली होती. “डोंबिवलीत माझ्याबरोबर असे अनेक वेळा घडले आहे की, मी रस्त्यावरून चालत असताना एका व्यक्तीनं माझ्या जवळून जाताना मला वाईटरीत्या स्पर्श केला. आणि मी मागे वळून पाहेपर्यंत मला समजलं नाही की, ती व्यक्ती कोण आहे, कारण- तो परिसर गर्दीने भरलेला होता”, असे ती म्हणाली.
डेझी शाह म्हणाली की, तिच्या परिसरातील गर्दीमुळे ती काहीही बोलू शकत नव्हती; पण जेव्हा ती जयपूरमध्ये शूटिंग करत होती तेव्हा तिला आवाज उठवावा लागला. ती म्हणाली, “मी जयपूर हवेलीमध्ये एका गाण्याचे शूटिंग करीत होते, ते एक प्रसिद्ध ठिकाण आहे. ते एक पर्यटनस्थळ आहे; पण तिथे आत आणि बाहेर फक्त एकच गेट आहे. त्यामुळे गर्दी झाली होती. त्या गर्दीत सुमारे ५०० लोक आणि सुमारे २०० डान्सर होते. जेव्हा त्यांनी पॅकअप म्हटले तेव्हा सर्व जण त्या गेटमधून पळू लागले आणि त्या गर्दीत कोणीतरी माझ्या पाठीला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला.”
डेझीने सांगितले की, तिने रागात तिच्या मागे असलेल्या लोकांना मारायला सुरुवात केली, ‘मी डावीकडे किंवा उजवीकडे पाहिले नाही. मी फक्त माझ्या मागे असलेल्या लोकांना मारायला सुरुवात केली. मी जो समोर दिसेल, त्याला मारले. कारण- मी खूप रागावले होते. मग जेव्हा आम्ही सर्व बाहेर आलो तेव्हा एका स्थानिक माणसाने मला धडा शिकवण्याची धमकी दिली. मी त्याला म्हणाले, ‘हो मला दाखव की, तू काय करणार आहेस.’ मी त्या व्यक्तीला मारले. कारण- तो नीट बोलत नव्हता आणि तो असे काही करीत होता; कारण- मी एक मुलगी होती. मी म्हणाले की, धाडसाने माझा सामना करा, तुम्ही भेकडांसारखे गर्दीत का लपून बसला आहात. मला तुमचा चेहरा दाखवा आणि मग काहीही करण्याची हिंमत करा. आहे हिंमत?”