छोट्या पडद्यावर अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली मालिका ‘तुला पाहते रे’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. या मालिकेत विक्रांत सरंजामेची भूमिका साकारणारा सुबोध भावे व इशा निमकरची भूमिका साकारणारी गायत्री दातार यांच्यातील केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मनं जिंकली. गायत्रीने या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं. हा संपूर्ण प्रवास तिच्यासाठी अत्यंत खास आहे. पहिलं प्रेम जितकं खास असतं, त्याला विसरता येत नाही, असंच काहीसं माझं या मालिकेबाबत नातं आहे, अशा शब्दांत गायत्रीने तिच्या भावना व्यक्त केल्या.
‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना गायत्री म्हणाली, ‘इशा निमकरच्या भूमिकेसाठी झी मराठीने मला संधी दिली ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. १४ वर्षांपूर्वी मी सुबोध दादासोबत काम करण्याचं स्वप्न पाहिलं होतं आणि या मालिकेच्या निमित्ताने माझ्या पहिल्याच प्रोजेक्टमध्ये ते स्वप्न पूर्ण झालं. या संपूर्ण प्रवासात मला खूप काही शिकायला मिळालं. विशेष म्हणजे माणूस म्हणूनही मी खूप बदलले. पुण्याहून मुंबईला येऊन एकटी राहू लागली. इथे सगळं स्वत:च्या स्वत: सांभाळणं हासुद्धा या प्रवासाचा एक भाग होता.’
‘प्रत्येक गोष्टीला सुरुवात, मध्य आणि शेवट असते. तसं आम्ही आता शेवटच्या वाटचालीकडे सुरुवात केली आहे. अजूनही मालिकेत खूप काही रंजक वळणे येणार आहेत,’ असंही तिने सांगितलं. या मालिकेत नुकतीच राजनंदिनीची एण्ट्री झाली आहे. इशाला पडलेलं स्वप्न खरं की खोटं, याचा उलगडा होत असताना आता इशाच राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचं दिसतंय. इशा हीच राजनंदिनी असल्याचं आता स्वत: इशालाही कळलं असून, तिचं एक वेगळं रूप प्रेक्षकांना पाहायला मिळतंय. त्यामुळे मालिकेचा शेवट कसा होणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.