‘भाबीजी घर पर हैं’ या लोकप्रिय कॉमेडी शोचा अभिनेता दीपेश भानच्या अचानक मृत्यूनं सर्वत्र शोककळा पसरली होती. त्याच्या अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्काच बसला होता. दीपेश भान गेल्यानंतर त्याच्यावर असलेल्या कर्जाची जबाबदारी कुटुंबावर आली. मात्र, आता त्याच्या कुटुंबियांनी ५० लाखांचं कर्ज फेडल्याचे समोर आले आहे. यासाठी ‘भाबीजी घर पर हैं’ अभिनेत्री सोम्या टंडनने त्याच्या कुटुंबाला मदत केली आहे.

दिपेश भान याच्या अचानक जाण्याने त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाची जबाबदारी त्याच्या पत्नीवर आली होती. तसंच ५० लाखांचं गृहकर्ज देखील फेडायचे होते. मात्र, सौम्या टंडनमुळे दीपेश भानची पत्नी आणि तिच्या कुटुंबाची ही मोठी अडचण संपली आहे. दीपेश भानच्या पत्नीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात तिने सांगितलंय की, सौम्या टंडनच्या मदतीने तिच्या कुटुंबीयांनी अवघ्या एका महिन्यात गृहकर्जाची परतफेड केली आहे. त्यामुळे सध्या सौम्यावर कौतुकाचा वर्षाव होत असलेला पहायला मिळत आहे.

( हे ही वाचा: रणबीर-आलियाच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाने अ‍ॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीत ‘या’ हिट चित्रपटाला मागे टाकले)

सौम्या टंडनने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून दीपेश भानच्या कुटुंबासाठी मदत मागितली होती. याबाबतचा व्हिडीओ देखील तिने शेअर केला होता. यावेळी सौम्याने दीपेश भान यांच्या कुटुंबावर कर्ज असल्याचे सांगत लोकांना मदतीचे आवाहन केले होते. सौम्याने केलेले हे आवाहन यशस्वी ठरले असून दीपेश भानच्या कुटुंबियांचं कर्ज अखेर फिटलं आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

( हे ही वाचा: ‘त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय..’ अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केली केआरकेची पाठराखण)

‘भाबीजी घर पर हैं’ फेम दीपेश भान याचा मृत्यू २३ जुलै रोजी ब्रेन हॅमरेजमुळे मृत्यू झाला. सकाळी क्रिकेट खेळताना तो पडल्याने त्याच्या नाकातून रक्त आल्याने त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.