करोना व्हायरसमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे सामान्य माणसांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत सर्वांनाच फटका बसला. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘जोधा अकबर’मध्ये काम करणारे अभिनेते लोकेंद्र सिंह राजावत यांच्यावर कठीण परिस्थिती ओढावली आहे. तणाव आणि डायबिटीस वाढल्यामुळे त्यांचा पाय कापावा लागला आहे.
लोकेंद्र यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांच्या आर्थिक परिस्थितीविषयी देखील खुलासा केला आहे. ‘डायबिटीसकडे दुर्लक्ष करु नका. मी आता काही करु शकत नाही. महामारी येण्यापूर्वी मी योग्य पद्धतीने काम करत होतो. पण करोनामुळे काम मिळणे बंद झाले. त्यामुळे माझ्यावर आर्थिक संकट कोसळले. माझ्या उजव्या पायाला गाठ आलेली आणि त्याकडे मी दुर्लक्ष केले. इथूनच सगळी सुरुवात झाली. हळूहळू त्याचा संसर्ग पूर्ण शरीरात पसरु लागला. गँगरीनची समस्या उद्भवली’ असे लोकेंद्र म्हणाले.
आणखी वाचा : कपिल शर्मा- भारतीचे ‘बचपन का प्यार’ गाणे ऐकून चाहती पळाली, व्हिडीओ व्हायरल
पुढे ते म्हणाले, ‘मी तणावात होतो. कारण मला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडे काही मोजकेच पर्याय होते. डॉक्टरांनी माझा उजवा पाय कापला. मी जर १० वर्षांपूर्वी डायबिटीसकडे लक्ष दिले असते तर आज माझ्यावर ही परिस्थिती आली नसती.’ मुंबईतील भक्तिवेदांता हॉस्पिटलमध्ये लोकेंद्र यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सिंटाने मदत केल्याचे लोकेंद्र यांनी सांगितले. तसेच इतर काही कलाकारांनी देखील त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली.
लोकेंद्र सिंह राजावत यांनी ‘जोधा अकबर’ या मालिकेत शमसुद्दीन अटागा खानची भूमिका साकारली होती. ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतही ते झळकले होते.