उमेश कामत आणि मुक्ता बर्वेच्या ‘६१ मिनिट्स’ प्रेक्षकांच्या भेटीला, एक थरारनाट्य स्टोरीटेल मराठीवर!

उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची जोडी ही एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे.

umesh kamat, mukta barve,
उमेश कामत आणि मुक्ता बर्वे यांची जोडी ही एव्हरग्रीन जोडी प्रेक्षकांच्या पसंती उतरली आहे.

मुक्ता बर्वे आणि उमेश कामत यांची ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकेने थोड्याच वेळात प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. आपणही जर या एव्हरग्रीन जोडीचे फॅन असाल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची, पण तितकीच धक्का देणारी बातमी आहे. उत्तमोत्तम ऑडिओ कन्टेन्ट निर्माण करणाऱ्या ‘स्टोरीटेल मराठी’ या प्लॅटफॉर्मने खास नव्याने तयार केलेल्या ‘६१ मिनिट्स’ या ओरिजिनल ऑडिओ ड्रामामध्ये मुक्ता आणि उमेश एका वेगळ्याच रूपात आपल्यासमोर येणार आहे. त्यांच्यासोबत ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे हे कलाकार असणार आहेत.

समजा.. आपण कुठे फिरायला गेलोय, कुटुंबाबरोबर मस्त वेळ घालवतोय, सगळं कसं छान चाललंय म्हणून मनातल्या मनात खुश होतोय, अन् अचानक आपल्याला कोणीतरी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?

मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता. म्हणूनच ते अश्या खोलीत प्रत्यक्षात सापडल्यानंतर पुरते हबकले आहेत. त्यात त्यांना तिथे कोणी किडनॅप करून आणलंय, त्यामागचं कारण काय, त्या किडनॅपरला हवंय काय हेही कोणी सांगत नाहीये. डोळ्यांत बोट घातलं तरी दिसणार नाही अश्या ठार अंधारात अखेर स्पीकरवरून एक घोषणा केली जाते, ज्यात त्यांना एक कोडं घातलं जातं, जे त्यांच्याच पूर्वायुष्याशी निगडित आहे. ते सोडवणं हाच त्या चौघांपुढे एकमेव पर्याय उरतो अन् सुरू होतं एक थरारनाट्य..! ते कोडं त्यांना सुटतं का? ६१ मिनिटांचं नक्की काय महत्त्व आहे? त्या चौघांना तिथे का आणलं आहे? तो किडनॅपर कोण आहे? त्याला नक्की काय हवंय? या सर्व प्रश्नांची उत्तरं म्हणजेच ‘६१ मिनिट्स’ या कहाणीचा ऑडिओ ड्रामा..!

 

View this post on Instagram

 

A post shared by Umesh Kamat (@umesh.kamat)

मुक्ता बर्वे हिने यापूर्वी रंगवलेली सर्व पात्रं ही हवीहवीशी, सर्वांना प्रेमात पाडणारी अशी आहेत. उमेश कामत हा तर लाखो तरुणींचा लाडका अभिनेता आहे. ओंकार गोवर्धन याने ‘सावित्री-ज्योती’ या मालिकेत रंगवलेली महात्मा ज्योतिबा फुले यांची भूमिका प्रेक्षकांच्या खास आवडीची ठरलीये. समीर पाटील आपल्याला ‘पोश्टर बॉयज्’, ‘पोश्टर गर्ल’, ‘विकून टाक’ अश्या धमाल विनोदी चित्रपटांचे लेखक-दिग्दर्शक म्हणून परिचित आहेत. पण तुम्ही जेव्हा ‘६१ मिनिट्स’ हा ऑडिओ ड्रामा ऐकाल तेव्हा या सर्व कलाकारांच्या प्रचलित इमेजेस ना धक्का देणाऱ्या भूमिका आपल्याला अनुभवायला मिळतील. या सर्व ताकदीच्या कलाकारांच्या अभिनयक्षमतेला पुरेपूर न्याय देणाऱ्या या भूमिका अन् त्यांच्यातल्या नाट्यातून उलगडणारा सस्पेन्स हा श्रोत्यांना थरारून टाकणारा आहे. ‘कौल’ हा सिनेमा गाजवणाऱ्या रोहित कोकाटेची या ऑडिओ ड्रामामध्ये विशेष भूमिका आहे.

आणखी वाचा : सुपर डान्सरमध्ये शिल्पाच्या ऐवजी परीक्षक म्हणून दिसणार रितेश-जेनेलिया!

‘इप्सिता’, ‘धारणा’, ‘अफेअर’ अश्या लोकप्रिय ठरलेल्या ‘स्टोरीटेल मराठी’च्या ओरिजिनल ऑडिओ सिरीजचा युवा लेखक तुषार गुंजाळ याच्याच लेखणीतून ‘६१ मिनिट्स’ हे थरारनाट्य उतरले आहे. सुमित्रा भावे-सुनील सुकथनकर या सुप्रसिद्ध दिग्दर्शक जोडगोळीच्या हाताखाली सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलेल्या तुषारनेच या ऑडिओ ड्रामाचे दिग्दर्शनसुद्धा केलेले आहे.

आणखी वाचा : “शिल्पा शेट्टीला नक्कीच माहीत असणार पतीचे कारनामे”

‘६१ मिनिट्स’ या ऑडिओ ड्रामाच्या शेवटी जो अनुभव मिळतो तो सर्वांपर्यंत पोहचणं अत्यंत गरजेचं आहे. तो अनुभव घेण्यासाठी अन् मुक्ता बर्वे, उमेश कामत, ओंकार गोवर्धन, समीर पाटील आणि रोहित कोकाटे या कसलेल्या अभिनेत्यांच्या आवाजातली थरारक जादू अनुभवण्यासाठी ‘६१ मिनिट्स'(61 Minutes) हा ऑडिओ ड्रामा आपल्याला ‘स्टोरीटेल’ हे app डाऊनलोड करावं लागणार आहे. ‘स्टोरीटेल’द्वारे सर्व भारतीय भाषांमध्ये ऑडिओबुक्सची निर्मिती केली जात आहे आणि त्याला साहित्यप्रेमी वाचक श्रोत्यारसिकांचा अमाप प्रतिसाद मिळू लागला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Umesh kamat and mukta barve s 61 minutes audio book experience of thriller stories dcp