अभिनेता जॉनी डेप आणि अभिनेत्री अँबर हर्ड यांच्या घटस्फोटाचं प्रकरण मध्यंतरी चांगलंच गाजलं. त्यांची कोर्टातली सुनावणी ही चक्क लाईव्ह दाखवण्यात येत होती. सामान्य लोकांनी यामध्ये चांगलाच रस घेतला आणि बऱ्यापैकी लोकं ही जॉनी डेपच्या बाजूने उभी होती. या सुनावणीदरम्यान दोघांनी एकमेकांवर खूप आरोप केले. अखेर निकाल जॉनीच्या बाजूने लागला. आता या नाट्यमय घटनेवर चित्रपट बनणार असल्याची बातमी समोर येत आहे.

एएनआयच्या वृत्तानुसार ‘हॉट टेक : द डेप/हर्ड ट्रायल’ या नावाचा एक चित्रपट टुबी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मोफत प्रदर्शित होणार आहे. मेलिसा मार्टी ही अभिनेत्री जॉनी डेपच्या वकिलाची भूमिका साकारणार असून मेरी करिग ही अँबरच्या वकिलाची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात २ महीने सुरू असणाऱ्या मानहानिच्या सुनावणीवरच प्रकाश टाकण्यात येणार आहे. हा कोणत्याही कलाकाराचा बायोपिक नसून यामध्ये केवळ तथ्यांच्या आधारेच या केसबद्दल खुलासा केला जाणार आहे.

हा चित्रपट सामाजिकदृष्ट्या वेळेवर बनलेला एक महत्त्वाचा चित्रपट आहे. असं या चित्रपटाच्या मेकर्सचं म्हणणं आहे. जे नाट्य लोकांनी इतके दिवस चवीने पाहिलं त्याचीच पुनरावृत्ती चित्रपटाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न आहे असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. अभिनेता जॉनी डेप आणि अँबर हर्ड यांनी अजूनतरी या चित्रपटासंदर्भात कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही.