उषा नाडकर्णी कित्येक वर्षांपासून प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करीत आहेत. नाटक, मालिका, चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. तसेच मराठीसह हिंदीतही उषा नाडकर्णी यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप उमटवली आहे.

‘पवित्र रिश्ता’ या प्रसिद्ध टीव्ही मालिकेतील भूमिकेमुळे अधिक नावारूपाला आलेल्या उषा नाडकर्णी यांनी मुंबईतील त्यांच्या बालपणाबद्दल, कडक आई आणि त्याहूनही कडक वडिलांबरोबर वाढलेल्या त्यांच्या तारुण्याबद्दल सांगितले. लहानपणी त्यांचे वडील त्यांच्याबरोबर कसे वागले याबद्दलही त्यांनी सांगितले आहे. भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये उषा म्हणाल्या की, त्यांचे वडील त्यांना आणि त्यांच्या दोन भावंडांना जे हातात येईल अशा कोणत्याही वस्तूने मारायचे. एकदा त्यांच्या वडिलांनी त्यांच्या भावाला बेशुद्ध होईपर्यंत मारले होते. कोयत्याने त्याच्यावर हल्ला केला होता.

उषा म्हणाल्या की, त्यांचे वडील वायुसेनेत अधिकारी पदावर होते आणि त्यांची आई शिक्षिका होती. त्या म्हणाल्या, “जर त्यांना वर्तमानपत्र खराब झालेले किंवा वाकडे आढळले, तर ते रागावून ते फाडून टाकायचे. जर त्यांना दिसले की, आमच्या शाळेची पुस्तके व्यवस्थित रांगेत ठेवलेली नाहीत तर ते ती रागाने फाडून टाकायचे. माझी आई त्यांना सांगायची की, त्यांना नवीन खरेदी करावी लागतील म्हणून त्यांनी ती फाडू नयेत.”

उषा नाडकर्णी पुढे म्हणाल्या, “तो खूप हिंसक माणूस होता. आम्हाला त्यांची भीती वाटत असे. आमच्यापैकी एकाला मारहाण व्हायची आणि बाकीचे दोघे पळून जायचे. एकदा, माझ्या भावाला काही कारणास्तव मारहाण होत होती आणि मी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, तर त्यांनी माझ्यावरदेखील कोयत्यानं हल्ला केला होता. माझ्या हाताला दुखापत झाली होती आणि दुसऱ्या दिवशी माझं एक नाटक होतं. मी दुखापतीसह सादरीकरणासाठी गेले होते.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, त्यांचे वडील एकदा त्यांच्या भावाला बेशुद्ध होईपर्यंत मारत होते. “विशेषतः वाईट मारहाणीनंतर ते आमच्यासाठी खास आइस्क्रीम आणत असत,” असेही त्यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते.

उषा म्हणाल्या की, त्यांचे आई-वडील दोघेही त्यांनी अभिनेत्री बनण्याच्या कल्पनेच्या विरोधात होते. जेव्हा त्यांनी पहिल्यांदा हा विषय मांडला तेव्हा त्यांच्या आईने त्यांचे सर्व कपडे रस्त्यावर फेकून दिले होते आणि त्यांना घराबाहेर काढले होते. त्या निघून गेल्या आणि त्यांचे वडील त्यांना भेटायला येईपर्यंत त्या एका मैत्रिणीकडे राहिल्या आणि एक आठवड्यानंतर त्यांना परत आणले गेले. त्यांनी सांगितले की, त्यांना त्यांची खूप भीती वाटत होती. ७९ वर्षीय उषा मुंबईत एकट्या राहतात. त्यांनी सांगितले की, त्यांचा सर्वांत मोठा आधार असलेला त्यांचा भाऊ या वर्षाच्या सुरुवातीलाच वारला.