रुपेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचं झालं तर इथली बरीच लग्न अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हे अनोखं लग्न मोठ्या पडद्यावर कधी पाहायला मिळतंय याची उत्सुकता अनेकांनाच लागली होती. वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘What’s up लग्न’ हा चित्रपट १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि.’ या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरु केली आहे.
‘कॉफी आणि बरंच काही’, ‘मिस्टर अँड मिसेस सदाचारी’ या चित्रपटांनंतर वैभव आणि प्रार्थना या हिट जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. या जोडीसोबतच विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी यांच्याही भूमिका आहेत.
वाचा : हे माँ माताजी… दयाबेन मालिका सोडणार?
नातेसंबंध, सध्याची जीवनशैली दाखवतानाच तंत्रज्ञानाने आपल्याला कवेत घेतले आहे की, आपण तंत्रज्ञानाला कवेत घेतले आहे यावर ‘What’s up लग्न’ मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. धावपळीच्या युगात स्मार्ट संवाद साधत नातेसंबंधाची वीण कशा पद्धतीने जपली जाते हे दाखवणारा ‘What’s up लग्न’ हा चित्रपट प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देऊन जाईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.