Vedant Birla Tejal Kulkarni Wedding: उद्योगपती यशोवर्धन बिर्ला आणि अवंती बिर्ला यांचे चिरंजीव वेदांत बिर्ला विवाहबंधनात अडकले आहेत. वेदांत बिर्ला यांनी तेजल कुलकर्णीशी लग्न केलं. तेजल व वेदांत यांचा विवाहसोहळा २ नोव्हेंबर रोजी पार पडला. त्यानंतर ३ नोव्हेंबर रोजी त्यांच्या रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. रिसेप्शनला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली.

३३ वर्षांचे वेदांत बिर्ला हे बिर्ला प्रिसिजन टेक्नॉलॉजीज लिमिटेडचे ​​अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. उद्योगपती यशोवर्धन व अवंती बिर्ला यांचे चिरंजीव वेदांत बिर्ला यांनी २ नोव्हेंबर रोजी संजीव आणि सुप्रिया कुलकर्णी यांची मुलगी तेजल कुलकर्णीशी लग्नगाठ बांधली. या खासगी समारंभात फक्त जवळचे कुटुंबीय आणि मित्र उपस्थित होते.

वेदांत बिर्ला यांचे लग्न त्यांच्या घरी पार पडले. लग्नासाठी त्यांचे घर फुलांनी सजवण्यात आले होते. वेदांत बिर्ला यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून घराची झलक दाखवली आहे. ‘Mr And Mrs Vedant Birla’, असं कॅप्शन देत वेदांत बिर्ला यांनी इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

वेदांत बिर्ला व तेजल कुलकर्णी यांच्या लग्नाचे फोटो

या जोडप्याने ३ नोव्हेंबर रोजी मुंबईतील लोअर परळ येथील सेंट रेजिसच्या अ‍ॅस्टर बॉलरूममध्ये एका भव्य रिसेप्शन सोहळ्याचे आयोजन केले होते. या रिसेप्शनचा ड्रेस कोड इंडो-वेस्टर्न होता. या रिसेप्शन सोहळ्याला उर्वशी रौतेलाने तिच्या कुटुंबासह हजेरी लावली. अतुल अग्निहोत्री आणि अलविरा अग्निहोत्री, भूमी पेडणेकर, नीलम कोठारी आणि पूनम ढिल्लन यांनीही हजेरी लावली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कुटुंबासह पार्टीला हजेरी लावली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या.

वेदांत बिर्ला यांचे वडील यश बिर्ला हे यश बिर्ला ग्रुपचे चेअरमन आहेत. त्यांच्या एकूण व्यवसायाची उलाढाल ३,००० कोटींपेक्षा जास्त आहे. या ग्रुपच्या १० कंपन्या आहेत. यश बिर्ला यांच्याकडे मुंबईतील मलबार हिल्समध्ये बिर्ला हाऊस हे घर आहे. या घराची किंमत जवळपास ४२५ कोटी रुपये आहे. त्यांच्याकडे आणखी दोन घरं आहेत, एक ऋषिकेशमध्ये आणि दुसरे दिल्लीमध्ये. त्यांच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यूसह अनेक लक्झरी गाड्यांचे कलेक्शन आहे.