हिंदी चित्रपटातला मैलाचा दगड म्हणजे ‘शोले’. या चित्रपटाने मनोरंजनाच्या व्याख्याच बदलून टाकल्या. हा चित्रपट आजही तितकाच ताजा आहे. यातली गाणी, कथा, प्रत्येक पात्रं लोकांच्या अगदी जवळचं आहे. त्यापैकीच असं अजरामर झालेलं पात्र म्हणजे जेलरचं. ते साकारलं होतं ज्येष्ठ दिग्दर्शक गोवर्धन असरानी यांनी. ‘अंग्रेज के जमाने’ जेलर हे पात्र आजही प्रत्येकाला ठाऊक आहे. असरानी यांनी त्या काळात अशा बऱ्याच छोट्या भूमिका साकारल्या आहेत. तसंच अमिताभ बच्चन, राजेश खन्नासारख्या स्टार्सपासून गोविंदा, शाहरुख, अभिषेक बच्चनसारख्या वेगवेगळ्या अभिनेत्यांबरोबर काम केलं आहे.

असरानी यांनी ३५० हून अधिक चित्रपटात काम केलं आहे. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्याबरोबर २५ हून अधिक चित्रपटात असरानी झळकले आहेत. ‘बावर्ची’, ‘आप की कसम’, ‘अजनबी’ हे त्यापैकी काही गाजलेले चित्रपट. मध्यंतरी त्यांनी एका मुलाखतीमध्ये राजेश खन्ना यांच्याविषयी एक खुलासा केला होता.

फिल्मफेअरला दिलेल्या या मुलाखतीमध्ये असरानी म्हणाले होते की, “मी राजेश खन्नाबरोबर हृषीदा यांच्या ‘नमक हराम’ या चित्रपटात काम केलं. तेव्हा राजेश खन्नाबरोबर अमिताभ बच्चनसुद्धा महत्वाच्या भूमिकेत होते. त्याआधी अमिताभ यांचे बरेच चित्रपट आपटले होते आणि ‘जंजीर’ हा चित्रपत अजून प्रदर्शित व्हायचा होता. त्या दोघांमध्ये वैमनस्य नव्हतं पण राजेश खन्नाची वृत्ती स्वतःचं वर्चस्व गाजवायची होती, त्याला नेहमी वाटायचं कुणीही माझी जागा घेऊ शकणार नाही, आणि राजेश खन्नाच्या याच स्वभावामुळे त्यावेळेस चित्रपटाच्या सेटवर कायम चर्चा व्हायची.”

असरानी आणि राजेश खन्ना यांची मैत्री फार चांगली होती. त्यांनी याबद्दल आणखीन खुलासा केला. ते म्हणाले, “राजेश खन्नाचे फार कुणी मित्र नव्हते. तो केवळ त्यांनाच जवळ ठेवायचा जे त्याच्याविषयी चांगलं बोलत असत. त्याच्या कारकिर्दीला लागलेला उतरती कळा कधीच त्याला जाणवली नाही. त्याने कधीच स्वतःमध्ये बदल केला नाही. अगदी शेवटपर्यंत त्याचा स्वभाव तसाच होता.”

आणखी वाचा : जबरदस्त अॅडव्हान्स बुकिंग झालेल्या ‘ब्रह्मास्त्र’ने पहिल्या दिवशी कमावले इतके कोटी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सलग १७ सुपरहीट चित्रपट देणाऱ्या राजेश खन्नाची ही बाजू असरानी यांच्या या मुलाखतीमधून समोर आली. असरानी यांनी प्रमुख भूमिका फार क्वचित केल्या. त्यांचं विनोदाचं टायमिंग आणि कोणत्याही भूमिकेला कमी न लेखण्याचा स्वभाव यामुळे ते आजच्या तरुण पिढीबरोबर त्याच जोमाने काम करत आहेत.