ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे पुण्यात निधन झाले आहे. ते ७७ वर्षांचे होते. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक कालाकारांनी गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे सिनेसृष्टीतील चालते-बोलते विद्यापीठ होते, अशी भावना व्यक्त केली जात आहे. विक्रम गोखलेंच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यातील एका व्हिडीओ ते नवोदित कलाकारांना गुरुमंत्र देताना दिसत आहेत.

विक्रम गोखले हे गेल्या काही दिवसांपासून नवोदित कलावंतांना अभिनयाचं प्रशिक्षण देण्याचंही काम करत होते. काही वर्षांपूर्वी क्यूब नाईन आणि एच. आर. झूम फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने विक्रम गोखले यांच्या मार्गदर्शनाखाली विनामूल्य अभिनय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी नवोदित कलाकारांना मार्गदर्शन केले. अभिनय कला कशी जोपासावी, तसेच अभिनयाचे विविध पैलू यावर विक्रम गोखले यांनी थेट संवाद साधला होता.
आणखी वाचा : BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

त्यावेळी ते म्हणाले, “अभिनय म्हणजे केवळ संवादफेक नव्हे. त्यासाठी भाषेवर प्रभुत्व हवे आणि चेहऱ्यावर हावभाव असले पाहिजेत. लेखनातील बारकावे कळण्यासाठी नटाने वाचन केले पाहिजे. अभिनय कला ही मोठी साधना आहे. ती जोपासल्याखेरीज नट हा अभिनयातील नटसम्राट होत नाही.”

“सध्या चित्रपटसृष्टीला नवीन उमेदीच्या कलाकारांची गरज आहे. मी अनेक नवीन कलाकारांबरोबर काम केले आहे. सध्याच्या पिढीतील कलाकारांमध्ये मोठ्या प्रमाणात गुणवत्ता आहे. मात्र, त्यांना योग्य दिशेने मार्गदर्शन होत नाही. जर त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर अनेक नवोदित कलाकार अभिनयामध्ये आपली कारकीर्द घडवू शकतील”, अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली होती.

आणखी वाचा : दुखापतीमुळे अमोल कोल्हे सक्तीच्या विश्रांतीवर, तेजस्विनी पंडितने फोटोवर केलेली कमेंट चर्चेत

दरम्यान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा सर्वच माध्यमांतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शनही केलं, त्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘आघात’ हा चित्रपटाचे समीक्षकांनी कौतुक केले होते. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘अनुमती’ या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर कला क्षेत्रातील योगदानाबद्दल विक्रम गोखले यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बलराज साहनी-साहिर लुधियानवी फाउंडेशनतर्फे बलराज साहनी पुरस्कार, क्रीडामहर्षी हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार यांसारख्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले. पुलोत्सव सन्मान यांसह चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कार अशा महत्त्वाच्या पुरस्कारांचेही गोखले मानकरी होते.