बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते युसूफ हुसैन यांचे निधन झाले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता यांनी सोशल मीडियावर त्यांचे निधन झाल्याची बातमी दिली. हंसल मेहता यांनी एक भावनिक पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली. युसूफ हुसैन यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटात, मालिकेत काम केले आहे. ‘दिल चाहता है’, ‘ओह माय गॉड’, ‘दबंग ३’, ‘धूम’ यासारख्या अनेक चित्रपटात त्यांनी भूमिका निभावली. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे.

“मी शाहिद या चित्रपटाचे २ शेड्युल पूर्ण केले होते. पण काही कारणामुळे मी अडकलो होतो. मी अडचणीत सापडलो होतो. चित्रपट निर्माता म्हणून माझी कारकीर्द संपत आली होती. त्याचवेळी ते (युसूफ हुसैन) माझ्याजवळ आले. त्यांनी मला सांगितले की माझ्याकडे एक फिक्स्ड डिपॉझिट आहे. मला त्याचा काहीही उपयोग नाही. तू जर अडचणीत असशील तर…असे सांगतच त्यांनी एका चेकवर सही केली. यानंतर शाहिद चित्रपट पूर्ण झाला. ते माझ्या वडिलांसारखे होते,” अशी भावनिक पोस्ट हंसल मेहता यांनी लिहिली आहे.

त्यापुढे हंसल मेहता म्हणाले, “मात्र आज ते निघून गेले. युसूफ सर, या नवीन आयुष्यासाठी मी कायम तुमचा ऋणी असेन. आज खरंच मी अनाथ झालो. आता आयुष्य पूर्वीसारखं राहणार नाही. मला तुझी खूप आठवण येईल. माझी उर्दूही खराब राहिल आणि हो – लव्ह यू लव्ह यू लव्ह यू,” असेही हंसल मेहतांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे. हंसल मेहता हे युसूफ हुसैन यांचे जावई आहेत. त्यांनी युसूफ हुसैन यांची मुलगी सफीना हुसैन हिच्यासोबत लग्न केले आहे.

त्यांच्या निधनानंतर बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हळहळ व्यक्त केली आहे. बॉलिवूडमधील अनेक कलाकार, दिग्दर्शक यांच्या अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

युसूफ हुसैन यांची कारकिर्द

युसूफ हुसैन यांची कारकीर्द दीर्घकाळ गाजली. त्यांनी आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपट आणि टेलिव्हीजन मालिकेत काम केले आहे. २००२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अब के बरस’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी ‘विवाह’, ‘दिल चाहता है’, ‘राज’, ‘हजारों ख्वाईशे ऐसी’, ‘धूम’, ‘शाहिद’, ‘ओह माय गॉड’, ‘क्रिश ३ट, ‘रईस’, ‘दबंग ३’, ‘द ताश्कंद फिल्म्स’, ‘जलेबी’ यासारख्या अनेक चित्रपटात काम केले. तर ‘सीआयडी’, ‘तुम बिन जाऊ कहां’, ‘कुमकुम: एक प्यारा सा बंधन’, ‘श्श्शू… कोई है’ आणि ‘मुल्ला नसरुद्दीन’ यासारख्या मालिकेत त्यांनी उल्लेखनीय भूमिका साकारल्या.