ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन झालं आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दया डोंगरे हे नाव घेतलं की रुपेरी पडद्यावरची खाष्ट सासू उभी राहते. मराठी चित्रपटसृष्टीतला खलनायकी चेहरा म्हणून दया डोंगरे यांच्याकडे पाहिलं जात असे. १९९० नंतर त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणं थांबवलं. दया डोंगरे यांच्या आई यमुताई मोडक या देखील अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आत्या शांता मोडक याही गायिका आणि अभिनेत्री होत्या त्यामुळे कलेचा वारसा त्यांना घरातूनच लाभला. ११ मार्च १९४० ला दया डोंगरे यांचा जन्म झाला होता. त्यांना गायन क्षेत्रात जाण्याची इच्छा होती. शालेय जीवनापासून त्यांनी शास्त्रीय आणि नाट्यसंगीत यांचं प्रशिक्षण घेतलं होतं. वयाच्या ८५ व्या वर्षी दया डोंगरे यांची प्राणज्योत मालवली. चित्रपट समीक्षक आणि अभ्यासक दिलीप ठाकूर यांनी लोकसत्ता ऑनलाइनला ही माहिती दिली.

दया डोंगरे यांना गायिका होण्याची होती इच्छा

दया डोंगरे यांनी वयाच्या १२ व्या वर्षी आकाशवाणीच्या कर्नाटक धारवाड केंद्राच्या उद्घाटन प्रसंगाच्या वेळी गाणं म्हटलं होतं. शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दया डोंगरे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. पुरुषोत्तम करंडक, एकांकिका स्पर्धा यामधून त्यांनी अभिनय केला. ज्यामुळे त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून नाटकाचे उच्च शिक्षण घेतलं. या दरम्यान त्यांचं लग्न शरद डोंगरे यांच्याशी झालं. शरद डोंगरे यांनीही त्यांची कलेची आवड जपली.

ललिता पवार यांच्यानंतर खलनायिका म्हणून दया डोंगरे यांचा लौकिक

आव्हान, नवरी मिळे नवऱ्याला, खट्याळ सासू नाठाळ सून अशा चित्रपटांमधून त्यांनी काम केलं. तसंच मालिका आणि नाटकांमधूनही त्या काम करत होत्या. खलनायिकेच्या भूमिका त्यांनी मोठ्या प्रमाणावर साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीतलं ललिता पवार यांच्यानंतरचं खल भूमिका करणारं दुसरं नाव होतं ते दया डोंगरे यांचं. मराठीसह आश्रय, जुंबिश, नामचीन, दौलत की जंग अशा हिंदी चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. १९९० नंतर त्यांनी अभिनय करणं थांबवलं. २०१९ मध्ये नाट्य परिषदेतर्फे जीवन गौरव पुरस्कार देऊन दया डोंगरे यांचा सन्मान करण्यात आला होता.