मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री, दिग्दर्शिका स्मिता तळवलकर यांचे पार्थिव अनंतात विलिन झाले. बुधवारी दुपारी दादर येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात सकाळी दहा वाजल्यापासून त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. त्यांना अखेरचा निरोप द्यायला मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार पोहोचले होते. 
फोटो गॅलरी – स्मिता तळवलकर : समृद्ध अभिनेत्री 
गेल्या काही महिन्यांपासून स्मिता तळवलकर या कर्करोगाशी झुंज देत होत्या. अखेर मंगळवारी रात्री मुंबईतील जसलोक रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.
अनेक मराठी चित्रपटांतील दर्जेदार अभिनयासाठी त्या रसिकांना  परिचित होत्या. निव्वळ अभिनयासाठीच नव्हे तर , चित्रपट आणि टेलिव्हिजनवरील अनेक मराठी मालिकांची निर्माती, दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती.
फोटो गॅलरी – स्मिता तळवलकरांना अखेरचा निरोप..
‘तू तिथे मी’, ‘चौकट राजा’, ‘कळत नकळत’, ‘सातच्या आत घरात’ या दर्जेदार चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली होती. त्यामुळे स्मिता तळवलकरांच्या निधनाने मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

अल्पपरिचय
* शिक्षण – बीए तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, जनसंज्ञापन आणि पत्रकारिता.
* करिअरची सुरुवात – १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शनवर वृत्तनिवेदक म्हणून काम करण्यास सुरुवात. १९८३ पासून रंगभूमीवर कलाकार म्हणून कामास सुरुवात. १९८६ पासून चित्रपटसृष्टीत काम.
* एकूण ४० मराठी आणि तीन हिंदी मालिकांमध्ये अभिनय.
* १९८९ मध्ये स्वतःच्या निर्मिती संस्थेची सुरुवात. या निर्मिती संस्थेने पाच मराठी चित्रपटांची निर्मिती केली. त्यापैकी ‘कळत नकळत’ या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार.
* पेशवाई, नंदादीप, नुपूर, अवंतिका, ऊनपाऊस, अभिलाषा, अनुपमा, अर्धांगिनी, अभिमान, गोष्ट एका
* लग्नाची, गोष्ट एका जप्तीची या मराठी दूरचित्रवाणी मालिकांची निर्मिती.
* सवत माझी लाडकी, चौकट राजा, तू तिथे मी, सातच्या आत घरात आणि कळत नकळत या मराठी चित्रपटांची निर्मिती. या चित्रपटांना राज्य सरकारचे विविध पुरस्कार मिळाले.
* ‘मानो या ना मानो या’ या दूरचित्रवाणी मालिकेच्या चार भागांचे दिग्दर्शन.