‘पिया तूsss…. हेss हेsss’ असं म्हणतं कानांवर पडणारा तो आवाज आजही अनेकांच्या मनाचा ठाव घेतो. हा आवाज आहे गायिका आशा भोसले यांचा. भारतीय चित्रपट संगीत आणि एकंदर गायन क्षेत्रामध्ये आशा भोसले हे अनेकांच्याच आवडीचं नाव. कॅब्रे डान्स करणाऱ्या ‘हेलन’साठी गायलेलं एखादं गाणं असो किंवा मग मोहम्मद रफींच्या सुरांना साथ देत शर्मिला टागोरसाठी गायलेलं ‘इशारो इशारो मे’ हे गाणं, प्रत्येक अभिनेत्रीला त्यांचा आवाज शोभला.

आपल्या सुरेल आवाजाने अनेक गाण्यांना साज चढवणाऱ्या आशा भोसले यांचा आज वाढदिवस. वाढतं वय ही संकल्पनाच ठाऊक नसलेल्या या चिरतरुण आशाताईंना सोशल मीडियावरुन चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनीही आपल्या या लाडक्या बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

ममता बॅनर्जी, रितेश देशमुख यांच्यासोबतच बऱ्याच चाहत्यांनीही आशाताईंना ट्विटरच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. या सर्व शुभेच्छांमध्ये लक्ष वेधलंय ते म्हणजे लतादीदींच्या शुभेच्छांनी. ‘आज माझ्या लहान बहिणीचा वाढदिवस आहे… मी तिला आशीर्वाद देते की ती नेहमीच आनंदी आणि सुखी राहो’, असं ट्विट त्यांनी केलं. त्यासोबतच आशाताईंसोबतचे काही जुने फोटोही शेअर केले. या फोटोंमध्ये दोघींच्याही चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे.

Happy Birthday Asha Bhosle : आशाताई ‘आम्ही ठाकरं…’वर ठेका धरतात तेव्हा

गाणे गाण्यासाठी त्या जेवढ्या उत्सुक असतात तितकीच उत्सुकता त्यांच्या नेहमीच्या वागण्याबोलण्यातही दिसून येते. त्यांचा उत्साह बऱ्याचदा तरुणाईला लाजवतो. १९४३ च्या दरम्यान आशाताईंच्या सांगितीक कारकिर्दीला सुरुवात झाली. तेव्हापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास आजतागायत सुरुच आहे. त्यांची बरीच गाणी अनेकांच्याच प्लेलिस्टचा भाग आहेत. चित्रपटसृष्टीत त्यांनी आजवर बऱ्याच संगीत दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. पण ओ.पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेल्या आणि आशाताईंनी गायलेल्या गाण्यांना कानसेनांची विशेष पसंती मिळाली.