बऱ्याच दिवसांच्या खंडानंतर अभिनेता विद्युत जामवाल आगामी ‘कमांडो २’ चित्रपटातून मुख्य भूमिकेत दिसणार आहे. कमांडो २ या चित्रपटासाठी त्याने खूप मेहनत देखील घेतल्याचे समजते. दरम्यान, ‘कमांडो २’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. २०१३ साली प्रदर्शित झालेल्या ‘कमांडो’ चित्रपटाचा हा सिक्वल आहे. ‘कमांडो’ या चित्रपटाने चित्रपटसृष्टीत पदार्पण करणा-या विद्युतला त्यामुळे बरीच प्रसिद्धी मिळाली होती. त्याआधी तो दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये झळकला होता.

‘कमांडो २’च्या ट्रेलरची सुरुवात एका अॅक्शन सीनने होते. यात भारतातील काळ्या पैशाचा ठिकाणा लावणा-या विकी चड्ढा या व्यक्तिच्या शोध घेण्यासाठी एक टीम तयार करण्यात आल्याचे दाखविण्यात आले आहे. त्यावेळी विकीला अटक करून त्याच्या पत्नीसह मलेशियात ठेवण्यात आल्याचे समोर येते. त्यासाठी चार जणांची टीम या दोघांना भारतात आणण्यासाठी मलेशियाला जाते. विद्युत म्हणजेच कॅप्टन करणवीर सिंग हा या टीमचा भाग नसतो. पण जिथे त्याची गरज असते तेथे तो नेहमीच पोहचतो. ट्रेलरमध्ये चित्रपटातील तीन मुख्य अभिनेत्री म्हणजेच ईशा गुप्ता, फ्रेडी दारुवाला आणि अदा शर्मा यांची झलक दिसते. साहस दृश्ये आणि एका रफ टफ हिरोव्यतिरीक्त ईशा आणि विद्युतची केमिस्ट्रीही ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे. रिलायन्स एन्टरटेंमेन्टने सोमवारी ‘कमांडो २’ चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवरून शेअर केला. या चित्रपटाची निर्मिती, दिग्दर्शक देवेन भोजानी करणार आहेत. यापूर्वी भोजानी यांनी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ आणि ‘सुमित संभाल लेगा’ यासारख्या विनोदी मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरमध्ये विद्युतच्या डोळ्याला डॉलरच्या नोटांनी झाकल्याचे दिसत होते. विद्युतच्या या चित्रपटाबद्दल त्याच्या चाहत्यांना चांगलीच उत्सुकता लागून राहिल्याचे पाहायला मिळत आहे. प्रदर्शित करण्यात आलेले हे पोस्टर ‘होमफ्रंट व्हिडिओ गेमच्या लोकप्रिय पोस्टरशी मिळते जूळते असे आहे. यापूर्वी ‘फोर्स’ या चित्रपटात विद्युत खलनायकाच्या भूमिकेत दिसला होता. विद्युत जामवाल सध्या अ‍ॅक्शन हीरो म्हणून नावाजला जातोय. त्याच्या या लोकप्रियतेमुळेच त्याला खलनायकाच्या भूमिकेलाही प्रेक्षकांनी चांगली पसंती दिली होती.

https://twitter.com/eshagupta2811/status/822372620850995201