गेले तीन महिने सगळ्या वाहिन्यांवर सुरू असलेल्या जुन्या मालिकांच्या जुन्याच भागांचे दळण पाहून कंटाळलेल्या प्रेक्षकांसाठी आता १३ जुलैपासून नवा अध्याय सुरू होणार आहे. मराठीसह हिंदीतील प्रमुख वाहिन्यांवरच्या मालिकांचेही नवीन भाग आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार असून मधल्या काही दिवसांत जुन्याच भागांमुळे वाहिन्यांपासून दुरावलेला प्रेक्षक आता पुन्हा मालिकांशी जोडला जाईल, असा विश्वास निर्माते आणि ब्रॉडकास्टर्स यांनी व्यक्त केला आहे.
गेल्या महिनाभरात मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर सुरक्षेच्या सगळ्या उपाययोजना आणि सरकारने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार मुंबई आणि परिसरासह बाहेरगावी चित्रित होणाऱ्या मालिकांच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. मालिकांच्या पुढच्या काही भागांचे चित्रीकरण होऊन ते वाहिन्यांपर्यंत पोहोचायला काही अवधी लागणार होता. हे लक्षात घेऊन सगळ्याच वाहिन्यांनी १३ जुलैपासून नवे भाग प्रसारित करावेत, अशी विनंती निर्मात्यांनी ब्रॉडकास्टर्सना केली होती. त्यानुसार मराठीतील झी मराठी, सोनी मराठी, स्टार प्रवाह आणि कलर्स मराठी या चारही वाहिन्यांवरील मालिकांचे नवीन भाग १३ जुलैपासून प्रसारित करण्यात येणार आहेत. हिंदीत ‘कलर्स’, ‘दंगल’ अशा काही वाहिन्यांवरील काही मालिकांचे नवे भाग २ जुलैपासूनच प्रसारित करण्यात आले होते. ‘झी टीव्ही’वरच्या ‘कुमकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’, ‘गुड्डन तुमसे ना हो पाएगा’ आणि ‘तुझसे है राबता’ अशा प्रमुख मालिकांचे नवीन भाग १३ जुलैपासूनच प्रसारित करण्यात येणार आहेत. तर ‘अॅण्ड टीव्ही’वरील मालिकांचे नवे भागही त्याच दिवसापासून दाखवण्यात येणार आहेत.
‘सोनी मराठी’ वाहिनीवर ‘स्वराज्यजननी जिजामाता’ आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या दोन्ही कार्यक्रमांचे नवे भाग १३ जुलैपासून रसिकांना पाहता येणार आहेत. टाळेबंदीआधी आणि नंतरच्या काळातही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन हा शो आता आठवडय़ातून चार दिवस प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘कलर्स मराठी’ वाहिनीवरील ‘राजा राणीची गं जोडी’ या मालिके च्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून १३ जुलैपासून नवे भाग पाहायला मिळतील, अशी शक्यता वाहिनीच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. सध्या करोनासंबंधीची मार्गदर्शक तत्त्वे पाळून अगदी काळजीपूर्वक चित्रीकरणं सुरू आहेत. शॉट देताना अंतराचा विचार करणे, काही नियमांनुसार कथेत करावा लागलेला बदल आणि अर्थातच सेटवर घ्यायची काळजी यामुळे चित्रीकरणाचा वेग सध्या मंदावलेला आहे. टीव्ही या माध्यमाला जो वेग असतो, त्या वेगावर या परिस्थितीमुळे नियंत्रण आले असल्याने हळूहळू एके क करत मालिकांचे नवे भाग प्रेक्षकांपर्यंत पोहोचतील. पुढच्या तीन ते चार आठवडय़ांत या सगळ्या प्रक्रियेला अधिक वेग येईल, अशी माहिती ‘कलर्स मराठी’चे व्यवसाय प्रमुख निखिल साने यांनी दिली. तीन महिन्यांपेक्षा अधिक काळाने या मालिकांचे नवे भाग रसिकांसमोर येणार असल्याने प्रत्येक वाहिनीने आपापल्या परीने त्याची प्रसिद्धीही अभिनव पद्धतीने सुरू केली आहे. चित्रीकरणात कुठल्याही पद्धतीने खंड पडू नये यासाठी अधिक काळजी घेऊन चित्रीकरण करण्यावर निर्माते आणि ब्रॉडकास्टर्स सगळ्यांकडूनच भर दिला जातो आहे.
‘शनाया’ परतणार..
राधिका-गुरुनाथ आणि शनाया या त्रिकु टाच्या गोष्टीने सुरू झालेल्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिके नेही आता कात टाकली असून त्याचे नवीन भाग प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या नवीन भागांबरोबर एक नवीन सुखद धक्काही प्रेक्षकांना मिळणार आहे. या मालिके च्या सुरुवातीपासूनच जिचे नखरे, जिचा मूर्खपणा, जिची फॅ शन आणि बिनडोकपणाने राधिका आणि गुरुनाथच्या संसारात चाललेली लुडबुड प्रेक्षकांना भलतीच आवडली होती, तीच शनाया आता पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिके च्या एका टप्प्यावर शनायाचा चेहरा बदलला होता. आता मूळ शनाया मालिके त परतणार असल्याने नवे भाग अधिकच नव्याने रंगतदार होतील यात शंका नाही.
शिवबाचा प्रवेश
डॉ. अमोल कोल्हे निर्मित ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील मालिका आता एका रंजक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. जिजाऊंची शिकवण, त्यांचा पराक्रम, संघर्ष यांची गाथा सांगणाऱ्या या मालिके त आता शिवबाचा प्रवेश होणार आहे. आत्तापर्यंत आपण शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाच्या गाथा पाहिल्या. ‘स्वराज्यजननी जिजामाता’ ही मुलूखावेगळ्या आईची गोष्ट आहे. या मालिकेत आता जिजाऊंनी रयतेचा राजा कसा घडवला?, याचे कथानक दाखवण्यात येणार आहे. या मालिके तील नव्या कथानकालाही रसिकांचे भरभरून प्रेम मिळेल, असा विश्वास अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. या मालिके त छोटय़ा शिवबाची भूमिका आर्यन रवींद्रनाथ लहामगे हा बालकलाकार साकारणार आहे. आर्यनने याआधी ‘एक होती राजकन्या’ आणि ‘सावित्रीजोती’ या मालिकेतून काम केले आहे. शिवबांच्या या भूमिके साठी आर्यनने खास तयारी केली असून त्यासाठी त्याने घोडेस्वारी आणि तलवारबाजीचेही प्रशिक्षण घेतले आहे.
