ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे आज पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. समाज माध्यमांवर अनेक कलाकारांनी विक्रम गोखले यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विक्रम गोखले यांनी नाटक, मालिका आणि चित्रपट अशा सर्वच माध्यमांमध्ये काम केले होते. त्यांनी रंगभूमीवर फार मोठा काळ गाजवला. त्याचप्रमाणे मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. विक्रम गोखले यांना त्यांच्या घरातूनच अभिनयाचा वारसा लाभला होता. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय सिनेसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या, विक्रम गोखले यांची आजी कमलाबाई गोखले याही अभिनेत्री होत्या आणि विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले हे सिनेमा आणि नाट्यसृष्टीतील लोकप्रिय गायक आणि अभिनेते होते. असा तीन पिढ्यांकडून विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा लाभला होता. गेली सात दशके त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले होते.

आणखी वाचा : BREAKING: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

अभिनयासोबतच विक्रम गोखलेंनी लेखन आणि दिग्दर्शन क्षेत्रातही काम केले. त्यांनी २०१० मध्ये ‘आघात’ या चित्रपटातून दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले होते. या चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले होते. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांना‘अनुमती’ या चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याबरोबरच त्यांना २०१५ मध्ये विष्णूदास भावे जीवनगौरव पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. तसेच त्यांना हरिभाऊ साने जीवनौरव पुरस्कार, पुलोत्सव सन्मानाने गौरवण्यात आले होते. तसेच काही वर्षांपूर्वी त्यांना चित्रपती व्ही.शांताराम जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा : विक्रम गोखलेंच्या निधनानंतर ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची प्रतिक्रिया म्हणाले, “अभिनयाची संस्था…”

गेल्याच महिन्यात त्यांनी स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांची भूमिका साकारली होती. त्यापाठोपाठ विक्रम गोखले यांची महत्त्वपूर्ण भूमिका असलेला ‘गोदावरी’ हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. विक्रम गोखले यांना गेल्या काही काळापासून घशाच्या दुखण्याने त्रस्त होते. यामुळेच त्यांनी नाटकातून संन्यास घेतला होता. तर सध्या ते नवोदित कलावंतांना अभिनयाचे प्रशिक्षण देण्याचेही काम करत होते. त्यांच्या निधानाने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vikram gokhale father grand mother and great grand mother were well known artists rnv
First published on: 26-11-2022 at 16:10 IST