सुपरहिरो हा शब्द जरी उच्चारला तरी चटकन ‘डीसी’ किंवा ‘माव्र्हल’ ही दोनच नावे आपल्या डोळ्यांसमोर येतात. या दोघांनी गेल्या सात दशकांतील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीतून सुपरहिरो क्षेत्रात जणू मक्तेदारीच निर्माण केली आहे. परंतु त्यांच्या या मक्तेदारीला ‘इमेज कॉमिक्स’, ‘चाल्टर्न कॉमिक्स’, ‘फँडम कॉमिक्स’ यांसारख्या कंपन्यांनी वेळोवेळी छेद देण्याचा प्रयत्न केला. आणि असाच एक प्रयत्न येत्या काळात ‘वॅलिन्ट कॉमिक्स’चा ‘ब्लडशॉट’ हा सुपरहिरो करणार आहे. ‘ब्लडशॉट’ हा ‘वॅलिन्ट कॉमिक्स’चा पहिला सुपरहिरोपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या व्यक्तिरेखेसाठी ‘ट्रिपल एक्स’ फेम अभिनेता विन डिझेलची निवड करण्यात आली आहे. विन डिझेल हा आज आघाडीच्या अॅक्शन स्टारपैकी एक आहे. ‘द फास्ट अँड द फ्युरिअस’, ‘द पेसिफायर’, ‘अ मॅन अपार्ट’, ‘फाइंड मी गिल्टी’ यांसारख्या सुपरहिट अॅक्शनपटांमधून धुमाकूळ घालणाऱ्या विन डिझेलची अॅक्शन इमेज व लोकप्रियतेचा वापर करण्याच्या उद्देशाने निवड केली असावी असा कयास काही चित्रपट समीक्षकांनी लावला आहे. अॅक्शन स्टार डिझेलने या व्यक्तिरेखेसाठी काही खास तयारी सुरू केली आहे. गेले काही महिने तो व्यायामशाळेत घाम गाळत आहे. शिवाय ‘ब्लडशॉट’ या सुपरहिरोला आत्मसात करण्यासाठी त्याच्यावर लिहिले गेलेले सर्व साहित्य तो समजून घेत आहे. ‘ब्लडशॉट’ हा सुपरपॉवर असलेला एक अमेरिकन सैनिक आहे. त्याच्याकडे ‘डेडपूल’ व ‘वुल्वरीन’ या माव्र्हल सुपरहिरोंप्रमाणेच कितीही दुखापत झाली तरी लगेच बरे होण्याची शक्ती आहे. तो सर्व प्रकारची हत्यारे वापरण्यात तरबेज आहे. शिवाय ‘एक्स मेन’मधील ‘मिस्टिक’प्रमाणे तो विविध रूपंही धारण करू शकतो. १९९२ साली केव्हिन व्हॅनहूक, डॉन पर्लिन आणि बॉब लेटन या तिघांनी मिळून ‘वॅलिन्ट कॉमिक्स’साठी या सुपरहिरोची निर्मिती केली होती. पहिल्या दोन टप्प्यांत ‘हल्क’, ‘कॅप्टन अमेरिका’, ‘द फ्लॅश’, ‘वंडर वुमन’ यांसारख्या प्रस्थापित सुपरहिरोंना टक्कर देणारा एक नवीन सुपरहिरो म्हणून त्याने ओळख मिळवली. अनेकांनी त्याची तुलना ‘लोगन’शीदेखील केली. त्यामुळे ‘ब्लडशॉट’ला वेळीच रोखण्यासाठी माव्र्हलने वॅलिन्ट कॉमिक्ससमोर ‘ब्लडशॉट’ निर्मितीचे हक्क विकत घेण्याचा प्रस्ताव ठेवला. परंतु त्यांनी त्यास नकार देत पुढे ‘वुडी’, ‘क्वॉन्टम’, ‘आर्मस्ट्राँग’, ‘शॅडोवुमन’, ‘निन्जा’ यांसारख्या अनेक सुपरहिरो व्यक्तिरेखा निर्मितीचा उद्योग सुरू केला. डीसी व माव्र्हलला कॉमिक्सच्या जगात वॅलिन्टने एक नवीन आव्हान निर्माण केले. मात्र पुढे कार्टून मालिकांमध्ये त्यांचे ते आव्हान टिकाव धरू शकले नाही. त्यामुळे त्यांच्या सुपरहिरोंना पुढे उतरती कळा लागली. परंतु, ‘ब्लडशॉट’ आता पुन्हा एकदा चित्रपटांच्या माध्यमातून जोरदार पुनरागमन करण्याच्या तयारीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 8th Apr 2018 रोजी प्रकाशित
‘ट्रिपल एक्स’ विन डिझेलचा ‘ब्लडशॉट’
‘डीसी’ आणि ‘माव्र्हल’च्या मक्तेदारीला ‘ब्लडशॉट’चे आव्हान
Written by मंदार गुरव

First published on: 08-04-2018 at 02:51 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vin diesel cast as bloodshot hollywood katta part