सध्या ‘रज्जो’च्या निमित्ताने विश्वास पाटील यांची चर्चा आहे. त्यांना भेटताच त्यांचे पहिले चित्रपट दिग्दर्शन ठरलेल्या ‘जन्मठेप’ या मराठी चित्रपटाची आठवण करून दिली. त्यावर ते म्हणाले, दरम्यान वीस वर्षे कधी गेली ते समजलेच नाही. १९९३ साली मी ‘चन्मठेप’च्या दिग्दर्शनाचे आव्हान पेलले. पण रज्जोसाठी मी एकदम तयार झालो नाही. दृश्य-दिग्दर्शक बिनोद प्रधान याच्याकडे चार चित्रपटासाठी सहाय्यक होतो. अगदी कॅमेरा वगैरे उचलून काम केले. पुरेसा अनुभव घेतल्यावर ‘रज्जो’चे काम सुरू केले. जयंत पवारची मूळ कथा आहे, तर उत्तम सिंगचे संगीत आहे. प्रत्येक दृश्य आणि नृत्य यात मी विशेष लक्ष घातले याचे मला समाधान आहे. कंगना राणावतला नाचता येत नाही असे म्हटले जात होते. पण ‘रज्जो’त तिने चोख उत्तर दिले आहे, विश्वास पाटील म्हणाले.
त्यांच्या ‘रज्जो’ला यश मिळो आणि मराठी चित्रपटाकडून हिंदीच्या दिग्दर्शनाकडे वळलेल्यांच्या अपयशाची परंपरा थांबो. कारण, यापूर्वी मराठी ठसा उमटवणारे असे सचिन कुंडलकर (सच्चा), चंद्रकांत कुलकर्णी (मीराबाई नॉकआऊट), केदार शिंदे (तो बात पक्की), संजय सूरकर (स्टॅण्डबॉय) असे अनेकजण हिंदीतील एकाच दिग्दर्शनातून मराठीत परतले. विश्वास पाटील हा विक्रम मोडतील असा विश्वास आहे.