‘कामसूत्र थ्रीडी’ च्या चित्रपटकर्त्यांनी अखेर चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित केला. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पौराणिक काळातील योद्धे भर समुद्रात एकमेकांशी लढतांना दिसतात. हे योद्धे काहीसे ‘३००’ या हॉलिवूडपटातील योद्धांसारखे भासत असून, ट्रेलर ‘पायरेट्स आफ द केरेबियन’शी साधर्म्य सांगणारा आहे. ‘कामसूत्र थ्रीडी’ चित्रपटाची कथा विश्वासघात आणि युद्धाभोवती गु्ंफलेल्या मनस्वी प्रेमाची कथा आहे. कामसूत्रात सांगितलेल्या प्रणय आणि शृंगारावर हा चित्रपट भाष्य करतो. प्रणयामुळे शरीर, मन आणि आत्म्यामध्ये कशाप्रकारे बदल होतात हे यात दर्शविले आहे.  भारतीय राजकुमारीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या शर्लीन चोप्राने अतिशय मादक स्वरुपात कामुकतेच्या भावना वठविल्या आहेत. मानवी शरीरसंबंधावर भाष्य करणाऱ्या ‘कामसूत्र’ या वात्सायनाच्या संस्कृत ग्रंथावर हा चित्रपट आधारीत आहे.
हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटात शर्लीन चोप्रा आणि मिलिंद गुणाजीची प्रमुख भूमिका असून, दिग्दर्शन रुपेश पॉल यांचे आहे. ‘कान चित्रपट महोत्सव २०१३’तील ‘मार्केट विभागात’ या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला असून, पुढच्या वर्षीच्या ‘कान चित्रपट महोत्सवात’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रिमियर करण्याची दिग्दर्शक रुपेश पॉलना आशा आहे.