बॉलिवूडमध्ये कायम पडद्यावर दिसणाऱ्या सुपरस्टारबद्दल बोललं जातं. पण चित्रपटात काही साईड अॅक्टर्सही असतात जे आपल्या हटके अंदाजाने एक वेगळी छाप पाडतात. पण अशा साईड अॅक्टर्सचा प्रेक्षकांना विसर पडतो. अभिनेता स्नेहल डाबी असाच एक कलाकार आहे. अभिनेता स्नेहल डाबीने आतापर्यंत अनेक चित्रपटात काम केलंय. १४ वर्षापूर्वी सुपरहिट ठरलेल्या ‘वेलकम’ या कॉमेडी फिल्ममध्ये त्याने काम केलं होतं. पण या कामाचे पैसे त्याला आजपर्यंत मिळाले नाहीत. अभिनेता स्नेहल डाबी याने एका माध्यमाशी बोलताना फिल्म प्रोड्यूसर फिरोज नाडियादवाला यांच्यावर आरोप केलाय.
फिल्म प्रोड्यूसर फिरोज नाडियादवाला यांच्यावर यापूर्वी सुद्धा कलाकारांचे पेमेंट न दिल्याचे आरोप करण्यात आले होते. ‘वेलकम’ चित्रपटाच्या रिलीज दरम्यान दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी सुद्धा त्यांची उर्वरित रक्कम न मिळाल्याची तक्रार केली होती. त्यानंतर अभिनेता स्नेहल डाबी याने हा आरोप केलाय. ‘मला १० कोटी रूपये दिले तरी मी फिरोज नाडियादवालाच्या चित्रपटात काम करणार नाही, दिलेला शब्द ते मागे घेतात”, असंही स्नेहल डाबीनं म्हटलंय.
अभिनेता स्नेहल डाबी याने फिरोज नाडियादवाला यांच्या प्रोडक्शनचे ‘हेरा फेरी’, ‘दीवाने हुए पागल’, ‘वेलकम’, ‘वेलकम बॅक’ सारख्या अनेक चित्रपटात काम केलंय. ‘वेलकम’ चित्रपटात काम केल्यानंतर आज १४ वर्षे झाली तरी त्याचं पेमेंट फिरोज नाडियादवाला यांनी दिलं नसल्याचं स्नेहल डाबीने सांगितलं. ज्या ज्या वेळी पैसे मागितले, त्या प्रत्येक वेळी देतो, असं सांगून फिरोज स्नेहलला केवळ आश्वासन देत गेले. काही काळानंतर फिल्म इंडस्ट्रीबाबत मोहभंग झाला असं देखील अभिनेता स्नेहल डाबीने सांगितलं.
स्नेहल डाबीसोबत हे पहिल्यांदाच घडलेलं नाही. याबद्दल सांगताना अभिनेता स्नेहल म्हणाला, “मी एका चित्रपटात काम केलं होतं. या चित्रपटाचं नाव ‘शेर’ असं होतं. यात अभिनेता संजय दत्त आणि विवेक ऑबेरॉय मुख्य भूमिकेत होते. मी या चित्रपटाचं लेखन देखील केलं होतं. आम्ही या चित्रपटाचं शूटिंग ५० डिग्री तापमान असताना सुद्धा केलं होतं. जवळजवळ ८० टक्के या चित्रपटाचं काम पूर्ण झालं होतं. अचानक प्रोडक्शन हाऊसने या चित्रपटाचं काम थांबवलं. त्या चित्रपटाचे मला पैसे मिळालेच नाहीत. विचार करा, त्यावेळी मला कसं वाटलं असेल. असंच ‘वेलकम’ चित्रपटाच्या वेळी सुद्धा झालं. आम्ही या चित्रपटासाठी वेळेवेळो दुबईमध्ये जात होतो. पण यात काम केल्याची कमाईच मला मिळाली नाही.”