छोटी गोष्ट मोठं मनोरंजन किंवा मोठी गोष्ट छोटं मनोरंजन या दोन्ही पद्धतीत न मोडणाऱ्या काही गोष्टी असतात. अगदी कोणाच्याही घरात घडू शकेल अशा एखाद्याच धम्माल प्रसंगावर बेतलेली कथा, त्यासाठी अगदी दोन-तीन नावाजलेल्या कलाकारांच्या जोडीने नवोदित कलाकारांवर दिलेला भर आणि मनोरंजनाच्या उद्देशाने केलेली मांडणी असा हलकाफुलका चित्रपट म्हणून ‘वेल डन आई’चा उल्लेख करावा लागेल.
आई आणि मुलाच्या नात्याची गोष्ट केंद्रस्थानी ठेवून केलेल्या ‘वेल डन आई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शंकर धुलगुडे यांनी केलं आहे. शंकर धुलगुडे यांचा स्वतंत्रपणे दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट आहे. त्यांनी याआधी साहाय्यक दिग्दर्शक म्हणून मराठी-हिंदी मालिकांमध्ये काम केेलेलं असल्याने दिग्दर्शनाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. मात्र, हा अनुभव मर्यादित असल्याने त्याचा प्रभाव ‘वेल डन आई’ या चित्रपटाचे पटकथा लेखन आणि मांडणी दोन्हींत जाणवतो. मालिकेच्या चित्रीकरणाचा अनुभव गाठीशी असल्याने त्याचा काही प्रमाणात फायदा चित्रपटाला झाला आहे, तर मालिकेसाठी आवश्यक असलेल्या थोड्याशा नाटकी-भडक पद्धतीच्या मांडणीचा वापर करण्यात आल्याने त्याचा तोटाही झाला आहे.
माने कुटुंबाची कथा या चित्रपटात आहे. या कुटुंबाचा कर्ताधर्ता असलेले शांताराम माने काम काहीच करत नाहीत. घरात बसून हुकूमशाही गाजवणारा, बायकोची सतत उणीदुणी काढणारा, ‘मला मान मिळालाच पाहिजे’ हा खाक्या घेऊन वावरणाऱ्या या गृहस्थामुळे त्याच्या मुलाचे लग्न रखडले आहे. आपल्या वयाच्या सगळ्या मुलांची लग्नं होत आहेत, पण आपलं लग्न वडिलांमुळे होऊ शकत नाही यामुळे खचत चाललेला दीपक अखेर आपल्या आईलाच साकडं घालतो. काहीही कर पण तू माझं लग्न करून दे, हे आईच्या गळी उतरवताना तो त्यासाठी मामाच्याच मुलीचा पर्यायही तिला सुचवतो. आपला नवरा आणि भाऊ यांच्यातून विस्तवही जात नाही, याची जाणीव असलेली दीपकची आई अर्थात शकुंतला माने यावर कसा तोडगा काढते? दीपकचं लग्न होतं का? याचं गमतीशीर चित्रण ‘वेल डन आई’ चित्रपटात पाहायला मिळतं.
या चित्रपटाचे कथालेखन दिग्दर्शक शंकर धुलगुडे यांनी संदीप गचांडे यांच्या मदतीने केले आहे. या चित्रपटाची बव्हंशी कथा ही बैठ्या चाळीतल्या दोन खणी घरात घडते. त्यातही बैठकीची मुख्य खोली थोडी मोठी आहे, त्यालाच लागून असलेल्या स्वयंपाकघरात जेमतेम दोघंच उभं राहतील एवढी जागा आहे. त्यामुळे या इतक्या मर्यादित जागेत कॅमेरा बसवून अँगल ठरवताना नाही म्हटलं तरी दिग्दर्शकाला मालिकेच्या चित्रणाचा अनुभव कामी आला आहे. पण, त्यामुळेच की काय चित्रपटाच्या कथेचा आणि चित्रीकरणाचा दोन्हींचा पैस फारच संकुचित झाला आहे.
या चित्रपटात शकुंतला माने ही भूमिका अभिनेत्री विशाखा सुभेदार हिने केली आहे. सहज विनोदी अभिनयात विशाखा सुभेदार यांचा हात कोणीही धरू शकत नाही. त्यामुळे एकीकडे नवऱ्याच्या दबावाखाली वावरणारी पण स्वत:चं एक वेगळं व्यक्तिमत्त्व असलेली शकुंतला माने त्यांनी ठसक्यात साकारली आहे. विशाखा सुभेदार यांच्या जोडीने आणखी दोन महत्त्वाच्या व्यक्तिरेखांमधला संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा विनोद रंगवण्यासाठी दिग्दर्शकाने विजय निकम आणि जयवंत वाडकर या दोन कलाकारांची निवड केली आहे. विजय निकम हे विक्षिप्त शांताराम माने यांच्या भूमिकेत चपखल बसले आहेत. तर शकुंतलाचा थोडासा घमेंडी आणि काहीसा बावळट भाऊ म्हणून जयवंत वाडकरांनीही आपल्या शैलीत ही भूमिका उत्तम निभावली आहे. या तिघांव्यतिरिक्त नायक – नायिकेच्या भूमिकेत असलेले आयुष पाटील आणि सिमरन खेडकर हे नवोदित कलाकार आहेत, पण दोघांनीही आपापल्या भूमिका चांगल्या केल्या आहेत.
कथा गमतीशीर आहे आणि कलाकारांनीही उत्तम साथ दिली आहे, पण मांडणी करताना विशेषत: काही विनोदाच्या जागा काढण्यासाठी अनाठायी दाखवलेली अतार्किकता आणि भडकपणे संवाद म्हणण्याचा सोस यामुळे त्यातली सहजता निघून जाते. त्यातही पूर्वार्धात चित्रपट रेंगाळतो, उत्तरार्धात मात्र एका वेगाने घटना घडत जातात त्यामुळे थोडी गंमत येते. पूर्णत: कौटुंबिक मनोरंजक कथा आहे, विनोदाचा काही प्रमाणातला शिडकावा सुखावणारा असल्याने अगदीच दुर्लक्ष करता न येणारा, काही प्रमाणात जमलेला असा हा हलकाफुलका चित्रपट आहे.
दिग्दर्शक – शंकर धुलगुडे
कलाकार – विशाखा सुभेदार, विजय निकम, जयवंत वाडकर, आयुष पाटील, सिमरन खेडकर, बीना सिद्धार्थ, विपुल खंडाळे आणि तन्वी धुरी.
