Aftab Shivdasani Once Spoke About Facing Casting Couch : बॉलीवूड जेवढं ग्लॅमरस आहे तेवढेच त्यात अनेक वाईट अनुभवही आहेत, जे प्रत्येकाच्या आयुष्यावर एक वेगळा परिणाम करतात. त्यातीलच एक म्हणजे कास्टिंग काऊचचा अनुभव. चित्रपटसृष्टीतील अनेक लोकांनी त्यांचे याबाबतचे अनुभव शेअर केले आहेत.

चित्रपटसृष्टीत काम करताना अनेकांना दिग्दर्शक किंवा निर्मात्यांकडून वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. काही कलाकारांबरोबर कास्टिंग काऊचचे धक्कादायक प्रकारही घडले आहेत. केवळ अभिनेत्रीच नव्हे, तर अभिनेत्यांनाही अशा ‘ऑफर’ मिळाल्या आहेत.

बॉलीवूड अभिनेता आफताब शिवदासानी यालाही इंडस्ट्रीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला. आफताब शिवदासानीने बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि नंतर मुख्य अभिनेता म्हणून सर्वांची मने जिंकली.

आफताबने ‘मिस्टर इंडिया’, ‘शहेनशाह’ व ‘चालबाज’ या चित्रपटांमध्ये बालकलाकार म्हणून काम केले आहे. नंतर ब्रेक घेतल्यावर त्याने मॉडेलिंग सुरू केले आणि मग चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. या काळात आफताबला कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला आणि त्याच्या मुलाखतीचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.

आफताबबरोबर काय घडले होते?

खरं तर, आफताब आणि विवेक ओबेरॉय, रितेश देशमुख व साजिद खान यांच्या ‘यादों की बारात’ या शोमध्ये एकत्र आले होते. या शोदरम्यान, आफताब सांगितले की, एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाने त्याला रात्री उशिरा फोन केला आणि एका हॉटेलमध्ये भेटण्यास सांगितले.

आफताब म्हणाला, “जेव्हा मी अभिनेता नव्हतो आणि म्युझिक व्हिडीओ व मॉडेलिंग करीत होतो, तेव्हा मी एका व्यक्तीला भेटलो, ज्यानं मला चित्रपटाचं आश्वासन दिलं. इंडस्ट्रीतील एक सुप्रसिद्ध व्यक्ती मला मध्यरात्री वारंवार फोन करून हॉटेलमध्ये बोलावत होती. चित्रपटात काम देतो, असं सांगून तो मला रात्री उशिरा फोन करायचा; पण ती व्यक्ती मला रात्री कॉल का करतेय हे कळून चुकलं होतं. मग मला कळलं की, हे सर्व मूर्खपणाचं आहे आणि मी त्याचे फोन उचलणं बंद केलं. त्यानंतर एक मोठं व्यक्तिमत्त्व, ज्याचं नाव मी घेणार नाही. मी त्याला एक-दोन वेळा भेटलो; पण जेव्हा मला त्याचे हेतू कळले तेव्हा मी त्याला भेटणं बंद केलं.”

आफताबने राम गोपाल वर्माच्या ‘मस्त’ या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केले. या चित्रपटात त्याच्याबरोबर ऊर्मिला मातोंडकर मुख्य भूमिकेत होती. त्यानंतर आफताब ‘आवारा पागल दिवाला’, ‘कसूर’, ‘हंगामा’, ‘क्या कूल हैं हम ३’, ‘१९२० द एव्हिल रिटर्न्स’ या चित्रपटांमध्ये दिसला. आफताबच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे झाले, तर तो आता ‘वेलकम टू द जंगल’, ‘मस्ती २’ व ‘कसूर २’मध्ये दिसणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.