आशा भोसले म्हणजे भारतीय मनोरंजन विश्वातील सदाबहार गायिका. आशा भोसलेंची गाणी गेली अनेक वर्ष रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत. आशा भोसलेंनी केवळ मराठी, हिंदीच नव्हे तर त्यांनी गुजराती व साऊथकडील गाणीही गायली आहेत.
आशा भोसले यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत मोठे योगदान दिले आहे, त्यांनी अनेक सदाबहार गाण्यांना आपला आवाज दिला आहे. त्यांच्या प्रसिद्ध गाण्यांमध्ये ‘पिया तू अब तो आजा’, ‘दम मारो दम’ व ‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा’ यांचा समावेश आहे. ही गाणी बोल्ड होती आणि त्यामुळे काही वाद निर्माण झाले होते. अलीकडेच गायिकेने त्यांच्या काही गाण्यांवर रेडिओवर बंदी घालण्यात आल्याची आठवण करून दिली.
रिपब्लिक भारतशी झालेल्या संभाषणात आशा भोसले यांनी खुलासा केला की, आर. डी. बर्मन सतत बोल्ड गाणी देत असल्याने त्यांना एकेकाळी राग येत असे, तर सर्व ‘चांगली’ गाणी त्यांची बहीण आणि प्रतिष्ठित गायिका लता मंगेशकर यांना देण्यात आली होती. पंचमदा यांनी आत्मविश्वासाने भाकीत केले होते की, १९७१ च्या ‘कारवां’ चित्रपटातील ‘पिया तू अब तो आजा’ हे गाणे प्रेक्षकांना खूप आवडेल आणि ते तसे झालेही.
गीतकार मजरूह सुलतानपुरी जेव्हा गाणे रेकॉर्ड करत होते तेव्हा त्यांनी कशी प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल देखील आशा भोसले यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “त्यांनी लिहिलेल्या काही बोलांमुळे त्यांना लाज वाटली म्हणून ते स्टुडिओमधून मध्येच निघून गेले. मजरूह सुलतानपुरी स्टुडिओतून निघून गेले आणि मला म्हणाले, “मी एक घाणेरडे गाणे लिहिले आहे. माझ्या मुली मोठ्या होतील आणि हे गाणे गातील.” आशा म्हणाल्या, “मला माहित होते की गाण्याचे संगीत चांगले आहे, परंतु मला माहित नव्हते की हे गाणे इतके प्रचंड हिट होईल.”
या गाण्याभोवतीच्या वादाबद्दल बोलताना आशा यांनी खुलासा केला की, त्यांच्या अनेक गाण्यांवर रेडिओवरून बंदी घालण्यात आली होती. “माझी तीन-चार गाणी बॉम्बे रेडिओवरून बंदी घालण्यात आली होती,” असं त्या म्हणाल्या. आशा भोसले यांचे आणखी एक हिट गाणे ‘पिया तू अब तो आजा’प्रमाणेच, देव आनंद यांच्या ‘हरे रामा हरे कृष्णा’ या चित्रपटातील ‘दम मारो दम’ हे गाणेही वादात सापडले होते. ऑल इंडिया रेडिओने या गाण्यावर बंदी घातली आणि जेव्हा हा चित्रपट टेलिव्हिजनवर प्रसारित झाला तेव्हा दूरदर्शनने ते काढून टाकले.
मराठीबरोबरच हिंदी सिनेसृष्टी गाजवणाऱ्या लोकप्रिय गायिका आशा भोसले यांच्या आवाजाची जादू आजही श्रोत्यांच्या मनावर कायम आहे. ९० वर्षांच्या आशा अजूनही गाण्याचे कार्यक्रम करताना दिसतात. वयाची नव्वदी पार केल्यानंतरही त्या अगदी सिने इंडस्ट्रीत सक्रिय आहेत.