लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हे भारतीय चित्रपटसृष्टीतील असे गायक आहेत, जे चित्रपटसृष्टीत नेहमीच लक्षात राहतील. आजही जेव्हा लता मंगेशकर यांची गाणी वाजवली जातात तेव्हा लोक आपोआपच त्यात हरवून जातात. मोहम्मद रफी हे देखील असे गायक आहेत, ज्यांचा आवाज आणि त्यांचा स्वभाव दिग्दर्शक आणि निर्मात्यांना इतका आवडला की जवळजवळ प्रत्येक चित्रपटात त्यांचे एक ना एक गाणे तरी होते.

गायन जगतातील दोन महान कलाकार, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी एकत्र आले तर तो चित्रपट सुपरहिट होणार हे निश्चित होते. दोघांनीही ‘जो वादा किया वो निभाना पड़ेगा’, ‘झिलमिल सितारों का आंगन होगा’ अशी अनेक सदाबहार गाणी एकत्र गायली. एक काळ असा होता जेव्हा इंडस्ट्रीतील हे दोन गायक एकमेकांशी भांडले आणि त्यांनी किमान चार वर्षे एकमेकांबरोबर काम केले नाही. त्यांच्या भांडणाचे कारण काय होते, ते आम्ही तुम्हाला सांगतो.

लता मंगेशकर ‘या’ गोष्टीवर रागावल्या होत्या

लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्यात ‘पैसा आणि अधिकार’वरून भांडण झाले होते. प्रयाग शुक्ल यांनी मोहम्मद रफी यांच्यावर लिहिलेल्या ‘मोहम्मद रफी ईश्वर की आवाज’ या पुस्तकात त्यांच्या भांडणाची कहाणी सांगितली आहे. त्यांनी या पुस्तकात सांगितले होते की, एकदा लता मंगेशकर यांनी गायकांच्या रॉयल्टीबद्दल आवाज उठवला होता.

लता मंगेशकर यांनी मोहम्मद रफींशीही यावर चर्चा केली होती आणि म्हणाल्या होत्या की, गायकांना त्यांच्या गाण्यांसाठी रॉयल्टी मिळायला हवी असे त्यांना वाटते. मोहम्मद रफी त्यांच्या बाजूने नव्हते. त्यांनी थेट लता मंगेशकर यांना सांगितले की, गायकांना त्यांच्या गायनासाठी पैसे मिळतात आणि त्यांचा गाण्यांवर कोणताही अधिकार नाही. मोहम्मद रफींकडून हे ऐकल्यानंतर लता मंगेशकर खूप चिडल्या होत्या.

लता मंगेशकर-रफी साहेबांनी चार वर्षे एकत्र काम केले नाही

पुस्तकात असेही नमूद केले आहे की, लता मंगेशकर रफी साहेबांवर इतक्या रागावल्या होत्या की त्यांनी त्यांच्याबरोबर चार वर्षे काम केले नाही. जेव्हा जेव्हा लता मंगेशकर यांना मोहम्मद रफी यांच्याबरोबर गाण्याची ऑफर दिली जात असे तेव्हा त्या कारण सांगून नकार देत असत. दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी ऐकलं नाही. लता मंगेशकर यांचे हे वर्तन पाहून रफी साहेबांनीही त्यांच्याबरोबर गाण्यात रस गमावला. दोघांनीही चार वर्षे एकत्र काम केले नाही.

जेव्हा मोहम्मद रफी यांना विचारण्यात आले की ते आता लता दीदींबरोबर का गात नाहीत, तेव्हा त्यांनी उत्तर दिले होते, “जेव्हा लताजींना माझ्याबरोबर गाण्यात रस नाही, तर मला त्यांच्याबरोबर गाण्यात रस का असेल.” लता मंगेशकर यांनी वारंवार नाही म्हटल्यानंतर, निर्मात्यांनी त्यांच्या जागी सुमन कल्याणपुरी यांना घेतले आणि मोहम्मद रफी यांची जोडी एका नवीन गायिकेबरोबर जोडली गेली. सुमन आणि रफी साहेबांनी एकत्र अनेक हिट गाणी दिली.

जेव्हा सुमन कल्याणपुरी आणि मोहम्मद रफी यांची जोडी हिट झाली तेव्हा लता मंगेशकर घाबरल्या आणि त्यांनी जय-किशन या गायिका जोडीला मोहम्मद रफींशी एकदा बोलायला लावण्याची विनंती केली. चार वर्षे चाललेल्या या भांडणाला सोडवण्यासाठी मोहम्मद रफी यांनीही सहमती दर्शवली. जय-किशन यांनी त्यांचा वाद सोडवला आणि पुन्हा दोघांनी एकत्र एका चित्रपटासाठी गाणे गायले.

नंतर मोहम्मद रफी यांच्या निधनानंतर २०१२ मध्ये लता मंगेशकर यांनी एक मुलाखत दिली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की गायकाने त्यांना माफीनामा लिहिला होता, ज्यामुळे त्या त्यांच्याबरोबर काम करण्यास तयार झाल्या. हे ऐकून मोहम्मद रफींचा मुलगा खूप रागावला होता.