Mumtaz on Shammi Kapoor : बॉलीवूडच्या दिग्गज अभिनेत्री मुमताज ‘नागीन’, ‘प्रेम कहानी’, ‘प्यार का रिश्ता’, यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखल्या जातात. मुमताज यांनी ६०-७० च्या दशकात सिनेसृष्टीवर राज्य केलं. त्या त्यांच्या काळातील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक होत्या.

लोक त्यांच्या सौंदर्याचे व अभिनयाचे कौतुक करायचे. त्यांची व राजेश खन्ना यांची पडद्यावरची जोडी लोकांना खूप आवडायची. याचबरोबर मुमताज व शम्मी कपूर यांच्या केमिस्ट्रीची त्याकाळी खूप चर्चा व्हायची.

मुमताज त्यांच्या सौंदर्यासाठी आणि कामासाठी ओळखल्या जात होत्या, पण आणखी एका गोष्टीमुळे त्या खूप चर्चेत होत्या; ती म्हणजे शम्मी कपूर यांच्याबरोबरचे त्यांचे नाते. दोघेही रिलेशनशिपमध्ये होते आणि त्यांनी लग्नाबद्दलही विचार केला होता. पण, कपूर कुटुंबामुळे ते वेगळे झाले आणि मुमताज यांनी मयूर माधवानी यांच्याशी लग्न केले. पण, आजही मुमताज यांना वाटते की शम्मी कपूरइतके कोणीही त्यांच्यावर प्रेम करू शकत नाही.

मुलाखतीत मुमताज यांनी शम्मी यांच्याबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे सांगितले होते. त्या म्हणाल्या की, शम्मी कपूर एक श्रीमंत आणि प्रसिद्ध व्यक्ती होते, म्हणून लोक त्यावर विश्वास ठेवू शकत नव्हते की मुमताज यांनी त्यांच्याशी लग्न करण्यास नकार दिला होता.

ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत मुमताज म्हणाल्या होत्या, “जग माझ्याशी लग्न करू इच्छित होते, पण मला कोणाबरोबर आनंदी राहायचे आहे हे मला ठरवायचे होते. शम्मी कपूर माझी खूप काळजी घेत होते आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते. कोणीही विश्वास ठेवत नव्हते की आम्ही प्रेमात आहोत. कोणीही विश्वास ठेवत नव्हते की मी लग्नासाठी त्यांना नकार दिला. कारण शम्मी श्रीमंत कुटुंबातून होते. लोक म्हणायचे, मुमताज शम्मीला कसे नकार देऊ शकते?”

त्या पुढे म्हणाल्या, “आज माझे लग्न मयूर माधवानीशी झाले आहे, देवाच्या कृपेने त्याच्याकडेही पैसे आहेत. मला वाटत नाही की शम्मीने मला जितके प्रेम दिले तितके मला कधीच मिळाले असेल.”

शम्मी कपूर यांच्या कुटुंबाला हे नातं मान्य नव्हतं

२०२० मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मुमताज यांनी सांगितले होते की, कपूर कुटुंबाला त्यांच्या सुनेने चित्रपटात काम करावं असं वाटत नव्हतं. त्या म्हणाल्या होत्या, “शम्मीजींनी मला सांगितले होते की जर मला त्यांना आनंदी पाहायचे असेल तर मला माझे करिअर सोडावे लागेल. आता त्या लहान वयात मी खूप महत्त्वाकांक्षी होते आणि कुठेतरी पोहोचू इच्छित होते. मला माझे कुटुंबही व्यवस्थित करायचे होते, पण मी फक्त घरी बसू शकत नव्हते.”

मुमताज यांनी त्यांच्या सौंदर्याने व सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ घातली होती. आजही वयाच्या ७७ व्या वर्षी त्यांचं सौंदर्य कमी झालेलं नाही. मुमताज यांनी त्यांच्या अद्भुत चित्रपट कारकिर्दीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत आपली खास ओळख निर्माण केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.