गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ऑस्कर पुरस्कारादरम्यान घडलेल्या एका घटनेची चर्चा सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्यादरम्यान सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर विजेता अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर भर कार्यक्रमात हात उचलला आणि सर्वजण थक्क झाले. या संपूर्ण घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओनंतर आता सोशल मीडियावर विल स्मिथचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमुळे तो फार चर्चेत आला आहे.

सिनेसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार म्हणून गौरवला जाणारा ९४ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा २८ मार्च रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी अभिनेता विल स्मिथ याने सूत्रसंचालक क्रिस रॉकवर हात उचलल्याची धक्कादायक गोष्ट समोर आली. क्रिस रॉक सर्वोत्कृष्ट माहितीपटाचा पुरस्कार सादर करण्यासाठी मंचावर आला होता. यावेळी क्रिसने विल स्मिथची पत्नी जॅडाच्या आजारपणाची खिल्ली उडवली. त्याच्या विनोदाने नाराज झालेल्या विल स्मिथने स्टेजवर जाऊन त्याला कानाखाली मारली आणि यानंतर एकच खळबळ उडाली.

“जो आपल्या मुलांची खोटी शपथ…”, ‘द कश्मीर फाइल्स’वरुन परेश रावल यांनी साधला अरविंद केजरीवालांवर निशाणा

या संपूर्ण प्रकरणानंतर नेटकऱ्यांनी विल स्मिथचा एक जुना व्हिडीओ शोधून काढला आहे. या व्हिडीओ विल स्मिथ हा एका टक्कल पडलेल्या व्यक्तीची खिल्ली उडवताना दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडीओ १९९१ मध्ये आर्सेनिया हॉलमध्ये आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यानचा आहे.

यात विल हा एका टक्कल पडलेल्या माणसाची खिल्ली उडवताना दिसत आहे. यावर उपस्थित असलेले सर्वजण टाळ्या वाजवताना दिसत आहे. त्याचा हा जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेक नेटकऱ्यांनी विल स्मिथला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे.

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर विल स्मिथने इन्स्टाग्राम पोस्टद्वारे यावर भाष्य केले होते. “कोणत्याही स्वरूपात होणारी हिंसा ही विषारी आणि विनाशकारी असते. काल रात्रीच्या अकादमी पुरस्कार सोहळ्यातील मी केलेले वर्तन हे पूर्णपणे अस्वीकार्य आणि अक्षम्य होते. माझी मस्करी करणं किंवा माझ्या कामाची खिल्ली उडवणं ठीक होतं पण जॅडाच्या वैद्यकीय स्थितीची खिल्ली उडवल्यानंतर सहनशक्तीचा अंत झाला आणि मी भावनेच्या भरात ते पाऊल उचलले.” असे विल स्मिथने म्हटले.

“मी चुकीचा होतो, मला…”; क्रिस रॉकच्या कानशिलात लगावल्यानंतर विल स्मिथची पोस्ट चर्चेत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“क्रिस, या प्रकरणानंतर मला तुझी जाहीरपणे माफी मागायची आहे. मी माझी हद्द ओलांडली. मी चुकीचा होतो. मला याची लाज वाटत आहे. मी काल केलेली ही कृती मला जो माणूस व्हायचे आहे, त्यासाठी योग्य नाही. प्रेम आणि दयाळूपणाच्या जगात हिंसेला स्थान नाही. मी अकादमीची, शोचे निर्माते, सर्व उपस्थित असलेल्या व्यक्तींची आणि जगभरात हा कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचीही जाहीर माफी मागू इच्छितो. मला विल्यम्स कुटुंबाची आणि माझ्या किंग रिचर्ड कुटुंबाचीही माफी मागायची आहे. माझ्या वागण्याने या सुंदर प्रवासावर एक डाग लागला आहे, याचे मला मनापासून खेद वाटतो. मी त्यावर काम करत आहे आणि करेन”, असे विल स्मिथ म्हणाला.