बॉलीवूडमध्ये ९०चे दशक गाजवणारी अभिनेत्री करिश्मा कपूर हिने गेल्यावर्षी जून महिन्यात आपल्या पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटापूर्वी करिश्मा आणि तिचा पती संजय कपूर यांच्यात बरेच वाद सुरु होते. १३ वर्ष एकत्र संसार केल्यानंतर या दोघांनी अखेर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेला. करिश्माशी घटस्फोट घेतल्यानंतर संजय आता त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करण्यास सज्ज झाला आहे. दिल्ली येथे राहणा-या प्रिया सचदेव हिच्यासोबत तो यावर्षी एप्रिल महिन्यात विवाहबंधनात अडकणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, कुटुंबिय आणि काही जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित हे दोघेजण न्यू यॉर्क येथे विवाहबंधनात अडकणार आहेत. तसेच, संजय आणि त्याचे कुटुंबिय या लग्नाविषयी मौन बाळगून आहेत. करिश्मा-संजयच्या घटस्फोटाचा काळ त्यांच्यासाठी खडतर होता. पण, आता मात्र या दोघांनाही वेगळ्या वाटा निवडत नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. दरम्यान, करिश्माच्या पूर्वाश्रमीच्या पतीचा विवाहसोहळा हा खूप खासगी पद्धतीने पार पडणार आहे.
संजय कपूरशी लग्न करणारी प्रिया सचदेव हिचादेखील हा दुसरा विवाह आहे. याआधी, अमेरिकेत हॉटेलचे मालक असणा-या संत चावला याचा मुलगा विक्रम याच्यासोबत तिने विवाह केला होता. तेव्हा या लग्नामुळे ती चर्चेत आली होती. उदयपूरमध्ये मोठ्या थाटामाटत उच्चभ्रू मंडळींच्या उपस्थित त्यांचा विवाहसोहळा पार पडला होता. मात्र, हे लग्न फार काळ टकल्याने प्रिया न्यू यॉर्कहून भारतात परतली होती. संजयप्रमाणेच प्रियादेखील एका उच्चभ्रू घराशी जोडलेली आहे. तिच्या वडिलांचा वस्त्र निर्यातीचा व्यवसाय असून या क्षेत्रात त्यांचं बरंच नाव आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून पदवीधर झालेल्या प्रियाने नंतर वर्षभर इनव्हेस्टमेन्ट बँकर म्हणून काम केले. पण, तिचा कल मात्र मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्राकडे होता.
प्रिया काही जाहिरातींचाही भाग झाली होती. तिने करिना कपूर हिच्यासोबत एक जाहिरात केली होती.
उदय चोप्रा आणि तनिषा मुखर्जी यांच्या ‘नील एन निक्की’ या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिका साकारली होती.
प्रियाने जॅझी बीच्या ‘सोनिये’ या म्युझिक व्हिडिओतही काम केले आहे.