‘थांबायच नाय गड्या, थांबायचं नाय’ हे वाक्य ऐकलं तरी डोळ्यासमोर ‘दे धक्का’ हा चित्रपट उभा राहतो. या चित्रपटात मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, शिवाजी साटम या त्रिकुटाच्या जोडीने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. यातील जाधव कुटुंबीय आणि त्यांचं आयुष्यातील धमाल मस्ती प्रेक्षकांना पुन्हा एकदा अनुभवता येणार आहे. ‘दे धक्का’ या चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकतचं या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये पुन्हा एकदा जाधव कुटुंबियांचा धमाल अंदाज पाहायला मिळत आहे.
दे धक्का या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात धनाजी, मकरंद जाधव, सुमती, सूर्यभान, सायली, किसना अशी पात्र पाहायला मिळत आहे. पण या चित्रपटाच्या पहिल्या भागात दिसणारी सायलीचे पात्र मात्र बदलण्यात आले आहे. या चित्रपटातील पहिल्या भागात सायलीची भूमिका अभिनेत्री गौरी वैद्य हिने साकारली होती. पण आता या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सायलीची भूमिका ही महेश मांजरेकर यांची लेक गौरी इंगवले साकारत आहे. यामुळे अनेक चाहते पूर्वीच्या सायलीला मिस करत आहेत.
नुकतंच महेश मांजरेकर यांनी याबाबत प्रश्न विचारण्यात आला. या चित्रपटाच्या सिक्वलमध्ये सर्व कलाकार असताना गौरी वैद्य का नाही? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर ते म्हणाले, गौरी वैद्य ही खूप चांगली डान्सर आहे. त्यासोबत तिला अभिनयाचीही उत्तम जाण आहे. पण सध्या ती एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहे. ती सध्या इंजिनिअरिंग शिकत आहे.
तिच्यात फारच बदल झाला आहे. तिची शरीरयष्टी, लूक हे सर्वच बदलले आहे. त्यामुळे तिला ओळखणे फार कठीण झालं आहे. या चित्रपटात किसनाची भूमिका साकारणार सक्षम हा काही अंशी तरी सारखाच दिसतो. पण तिच्यात पूर्ण बदल झाला आहे. त्यामुळे आम्हाला सायली या पात्राचे काय करायचे असा प्रश्न पडला होता. पण त्याचवेळी आमची गौरी आम्हाला सायली या भूमिकेसाठी सापडली, असे महेश मांजरेकरांनी सांगितले.
कार्तिकी गायकवाडच्या लहान भावाने वडिलांना भेट दिली मर्सिडीज गाडी, म्हणाली “अवघ्या २२ व्या वर्षी…”
दरम्यान गौरी इंगवले ही देखील उत्तम अभिनेत्री आहे. तिने पांघरुन चित्रपटाद्वारे सिनेसृष्टीत पदार्पण केले. ती उत्तम नृत्यांगना देखील आहे. तर २००८ नंतर गौरी वैद्यने फार कमी चित्रपटात भूमिका साकारली आहे. मात्र २००८ नंतर ती एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करत आहे. त्यामुळे गौरी वैद्यने अभिनय क्षेत्राला रामराम ठोकला आहे. त्यामुळेच गौरी वैद्य ऐवजी गौरी इंगवले हिची या चित्रपटासाठी वर्णी लागली आहे.