ह्रतिक का रागावला?

ह्रतिक रोशन सध्या अनेक चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आहे.

ह्रतिक रोशन सध्या अनेक चुकीच्या कारणांसाठी चर्चेत आहे. पहिल्यांदा केवळ त्याच्यात आणि सुझानच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. पण, नंतर त्याने स्वत:च सुझान आणि आपण वेगळे होत असल्याचे जाहीर केले. बार्बरा मोरी प्रेमप्रकरण, सुझानचा वेगळे होण्याचा निर्णय याचा परिणाम ह्रतिकच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यावरही होत असल्याचे बोलले जात असतानाच त्याने पुन्हा एकदा माध्यमांकडे निवेदन देऊन बॉलिवूडमध्ये त्याच्याविरोधात चाललेल्या तथाकथित कारवायांबद्दल राग व्यक्त केला आहे.
गेल्यावर्षी शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने तिकीटबारीवर सर्वाधिक कमाई केली. मात्र, त्यापाठोपाठ प्रदर्शित झालेल्या ह्रतिकच्या ‘क्रिश ३’ने सगळे विक्रम मागे टाकले. ‘क्रिश ३’ला मिळालेल्या प्रतिसादामुळे ह्रतिक आणि राकेश रोशन दोघेही आनंदित होते. पण, काही काळानंतर या चित्रपटाची कमाई खाली आल्याची चर्चा सुरू झाली आणि ह्रतिकचा रागरंग बदलला. आपल्या चित्रपटाबद्दल जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे ह्रतिकने आपल्या निवेदनात म्हटले आहे. ‘क्रिश ३’ने भारतात २४४ कोटींची क माई केली आणि परदेशात ५५ कोटींची कमाई केली. मात्र, तरीही या आकडेवारीबद्दल चुकीची माहिती पसरवली जाते आहे आणि तेही कोणाकडून तर एकेकाळी मी ज्यांना माझे मित्र म्हणत होतो त्यांच्याकडून..मी त्या सगळ्यांनाच सांगू इच्छितो की दुसऱ्याच्या यशामुळे असुरक्षित होण्यापेक्षा स्वत:च्या कामावर, मेहनतीवर लक्ष केंद्रित करा. म्हणजे तुमच्या आयुष्यातले ध्येय साध्य होईल.. अशा शब्दांत ह्रतिकने आपला राग व्यक्त केला आहे.
आता त्याच्या या एकेकाळच्या मित्रांच्या नावावरून नजर फि रवली तर त्याचे बोट शाहरूखकडेच आहे, असा अंदाज बांधला जाऊ शकतो. कारण, आमिर आणि त्याच्यात नुकतीच मैत्री झाली आहे. त्यामुळे, त्याच्या यशाने फरक पडलाच तर तो फक्त शाहरूखला पडेल, अशी अटकळ बांधली जात आहे. ह्रतिकने मात्र कोणाचेही नाव न घेता आपला आणि आपल्या वडिलांचा अपमान करणे थांबवा, असा सज्जड दमही भरला आहे. एवढय़ावरच न थांबता आपल्या कर्मावर विश्वास ठेवा, असे सांगणाऱ्या ह्रतिकने ‘क्रिश ३’ हे माझे आणि माझ्या वडिलांचे सांघिक यश आहे. ही तर फक्त सुरूवात आहे, असा इशाराही त्याच्या तथाकथित शत्रूटोळीला दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Why hrithik get angry