शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’ने तिकीट बारीचे सर्व रेकॉर्डस मोडून आमिरच्या ‘३ इडियट्स’ला मात दिली आहे. ‘चेन्नई एक्स्प्रेसने’ २०६ कोटी कमवून ‘३ इडियट्स’चा २०२ कोटींचा रेकॉर्ड मोडला आहे. मात्र, असे असतानादेखील आगामी ‘धूम ३’ चित्रपटाने आमिर त्याचे अग्रस्थान पटकवण्यात यशस्वी राहिल असे वाटते. तो खलनायकाची भूमिका करत असलेला ‘धूम ३’ यावर्षी २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. आमिर ‘धूम ३’ चित्रपटाने शाहरुखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चे रेकॉर्ड मोडेल, असे आमिरच्या चाहत्याने ट्विट केले आहे.
मध्यंतरी आमिरमुळे चित्रपटाचे प्रदर्शन एक आठवडा पुढे ढकलले जात असल्याची चर्चा होती. कारण, तो रिमा काग्तीच्या ‘तलाश’ आणि ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमाच्या चित्रिकरणात व्यस्त होता. मात्र, नुकतेच प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाच्या पोस्टरमुळे सर्व शंका दूर झाल्या आहेत. या पोस्टरने प्रेक्षकांमध्ये चांगले हिट्स प्राप्त केले आहेत.
आमिर पहिल्यांदा पूर्णपणे खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. यातून आता ‘धूम ३’ हा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ला मात देतो का, हे पाहणेदेखील सौख्याचे ठरेल.