दोन वर्षांपूर्वी अभिनेता हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्या वैवाहिक नात्यात दुरावा आल्यामुळे या दोघांनीही वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि अनेकांना त्यांच्या या निर्णयाने धक्काच बसला. पण, वैवाहिक नात्यात दुरावा आला असला तरीही हृतिक आणि सुझान यांच्यातील मैत्री आजही टिकून आहे. सोशल मीडियावर सध्या चर्चेत असणारे त्यांचे फोटो तरी निदान हेच सिद्ध करत आहेत. सुझान आणि हृतिक त्यांच्या मुलांसोबत नेहमीच जास्त वेळ व्यतीत करतानाही दिसत आहेत.
हृतिक आणि सुझान सतत काहीना काही कारणांमुळे एकत्र दिसत असल्यामुळे या दोघांच्याही नात्याचा गाडी पुन्हा एकदा रुळावर आली आहे का असाच प्रश्न अनेकांना पडत आहे. इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी हृतिक आणि सुझान त्यांच्या नात्याची पुन्हा नव्याने सुरुवात होणार असल्याची चर्चा रंगली होती. ते दोघे पुन्हा विवाहबद्ध होणार असल्याच्या चर्चेला आता उधाणच आल्याचे दिसते. याविषयीच ‘डीएनए’ सोबत बोलताना हृतिक म्हणाला की, ‘सुझान आणि मी आम्ही दोघंही फक्त चांगले मित्र आहोत. आम्हाला आजही एकमेकांची काळजी वाटते, आमचे आजही एकमेकांवर प्रेम आहे. याव्यतिरक्त आमच्यात सांगण्यासारखे काहीच नाही’, असे हृतिक म्हणाला. आपण सध्या जगत असलेल्या आयुष्यात खुपच आनंदी असल्याचेही हृतिकने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते. त्यामुळे आता या ‘काबिल’ अभिनेत्याच्या सांगण्यावरच अनेकांनी विश्वास ठेवला आहे. हृतिकच्या या वक्तव्यामध्ये त्याने लग्नाच्या बाबतीत कोणतीही वाच्यता केली नाही. त्यामुळे तुर्तास सुझान आणि हृतिक त्यांच्या मैत्रिपूर्ण नात्यालाच जास्त प्राधान्य देत आहेत, असेच म्हणावे लागेल.
सुझान आणि हृतिक २००० साली विवाहबद्ध झाले होते. त्यानंतर २०१४ पासूनच त्यांच्या नात्यामध्ये वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आणि शेवटी सुझान-हृतिकच्या इतक्या वर्षांच्या वैवाहिक नात्याला तडा गेला होता. घटस्फोटानंतरही हृतिक आणि सुझानने त्यांच्यामधले मैत्रिचे नाते कायम ठेवले आहे. हृतिक आणि सुझान सध्या त्यांच्या मुलांवरच जास्त लक्ष केंद्रित करत आहेत. हृतिक गेल्या काही द्वसांपासून त्याच्या ‘काबिल’ या चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. ‘काबिल’ या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे हृतिकच्या चित्रपट कारकिर्दिला एक प्रकारची कलाटणी मिळाली आहे असेच म्हणावे लागेल.