बॉलिवूडमधील प्रत्येक चित्रपटात अभिनेत्री एक वेगळा रंग भरण्याचे काम करते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळेच अभिनेत्रीशिवाय चित्रपटाची कोणीही कल्पना करु शकत नाही. स्त्री-पुरुष असमानतेच्या वागणुकीबद्दल चित्रपटसृष्टीही अपवाद नाही. या क्षेत्रात जुन्या काळात दिसणारा भेदभाव हळूहळू नाहिसा होताना दिसत आहे. स्त्री प्रधान चित्रपटातच नव्हे, तर प्रत्येक चित्रपटामध्ये आज अभिनेत्या इतकेच महत्व अभिनेत्रीला देखील दिले जाते. अभिनेता आणिअभिनेत्री यांच्यातील मानधनाबाबतचा मुद्दा देखील नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मात्र हळूहळू ही परिस्थिती बदलताना दिसत आहे. चित्रपटसृष्टीतील या बदलासोबतच आणखी एक उल्लेखनीय गोष्ट म्हणजे महिला या क्षेत्रात फक्त अभिनयाच्या जोरावरच नाही तर निर्मिती आणि दिग्दर्शनामध्येही आपली ओळख निर्माण करत आहेत.
चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रावरही महिलांनी स्वत:ला सिद्ध केले आहे. महिलांवर अनेक बंधने असणाऱ्या काळात अभिनेत्री फातिमा बेगम यांनी चित्रपटातील अभिनयासोबतच पटकथा लेखन, चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शन अशा भूमिकांतून एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यामुळेच फातिमा बेगम हे नाव महिलांसाठी प्रेरणादायी असेच आहे. फातिमा बेगम यांचे नाव फारच कमी लोकांना माहित असेल. पण भारतीय चित्रपटसृष्टीतील त्या पहिल्या महिला निर्माता आणि दिग्दर्शिका आहेत. ज्या काळात महिलांना घरातून बाहेर पडणे अशक्य होते, त्या काळात म्हणजे १९२६ मध्ये फातिमा यांनी अभिनयाच्या पुढील टप्प्यात पाऊल टाकत दिग्दर्शक म्हणून आपली नवी इनिंग सुरु केली होती. त्यातही विशेष म्हणजे त्या मुस्लीम कुटुंबातून होत्या. ‘बुलबुल-ए- पाकिस्तान’ या चित्रपटातून त्यांनी दिग्दर्शनास सुरुवात केली. त्यांच्या या चित्रपटामध्ये त्यांची मुलगी आणि अभिनेत्री जुबैदाने मुख्य भूमिका साकारली होती. चित्रपट निर्मिती आणि दिग्दर्शनामध्ये पाऊल टाकल्यानंतर त्यांनी ‘फातिमा फिल्मस्’ या स्टुडिओची निर्मिती केली. हा स्टुडिओनंतर ‘व्हिक्टोरिया फातिमा फिल्मस्’ नावाने ओळखला जाऊ लागला. याशिवाय त्यांनी अनेक चित्रपट पडद्यावर आणले.
त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत आज चित्रपटसृष्टीत अनेक महिला दिग्दर्शनाची जबाबदारी सक्षमपणे पार पाडताना दिसतात. पंजाबमधील दीपा मेहता यांनी आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या दिग्दर्शनामध्ये आपले नाव कमावले आहे. तर ओरिसाच्या मीरा नायर यांनी बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. बंगाली दिग्दर्शिका अमृता सेन यांनी तीन राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरुन या क्षेत्रात एक वेगळा ठसा उमटविला आहे. सध्याच्या घडीला फराह खान हे नाव सर्वांच्या चांगलेच परिचयाचे आहे. नृत्य दिग्दर्शनानंतर फराह खानने चित्रपट दिग्दर्शिकेचे व्रत हाती घेतले आहे. याव्यतिरिक्त तनुजा चंद्रा, झोया अख्तर, रिमा कग्ती, किरण राव आणि गौरी शिंदे या महिला बॉलिवू़डमध्ये दिग्दर्शिका म्हणून काम करताना दिसतात.