सिनेमा, सौजन्य –
रणवीर सिंग मुळात बडबडय़ा असून अर्जुन कपूर तुलनेने शांत स्वभावाचा आहे. चित्रपटात दोघांना एकमेकांच्या स्वभावाच्या एकदम उलटय़ा व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने दिल्या आहेत. बिक्रम हा शांत तर बाला हा भरपूर बडबडय़ा स्वभावाचा दाखविला आहे. रणवीर, अर्जुन दोघांनीही आपल्या स्वभावाच्या विरुद्ध भूमिका साकारण्यास सुरुवातीला नकार दिला होता. परंतु, दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी दोघांना राजी केले, असे बॉलीवूड सूत्रांकडून समजते.
प्रेम या विषयावर विविध कोनांतून पाहणारे चित्रपट ही यश चोप्रा यांची खासियत मानली गेली. परंतु, आपल्या कारकिर्दीत त्यांनी ‘काला पत्थर’ हा वेगळा चित्रपट केला आणि फारसा चालला नसला तरी हा चित्रपट ‘यश चोप्रा क्लासिक’ म्हणून गणला जातो. आपल्या मृत्यूपूर्वी त्यांच्याशी लेखक-दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी ‘गुंडे’ या चित्रपटाची गोष्ट आणि पटकथा याबाबत चर्चा करून मंजुरी घेतली होती. वास्तव स्थळी हा चित्रपट चित्रित करण्याची इच्छा त्या वेळी यश चोप्रा यांनी व्यक्त केली होती. त्याचबरोबर कोळसा खाणी, कोळसा माफिया, तिथली परिस्थिती यांतील अनेक बारकावेही यशजींनी दिग्दर्शकाला सांगितले होते. चित्रपटाची चित्रीकरणाची प्रक्रिया यश चोप्रा यांच्या निधनानंतरच सुरू झाली आहे.
अली अब्बास जफर यांचा दुसरा चित्रपट ‘गुंडे’ कोळसा माफिया या विषयावरचा असून संकल्पना, चित्रीकरण स्थळनिश्चिती आणि गोष्ट या पातळीवरचा यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट म्हणता येईल. ‘गोलियों की रास लीला राम-लीला’मुळे गाजलेला अभिनेता रणवीर सिंग आणि ‘इशकजादें’मुळे गाजलेला अभिनेता अर्जुन कपूर यांच्या प्रमुख भूूमिका असलेल्या ‘गुंडे’मध्ये प्रियांका चोप्रा कॅब्रे डान्सर नायिका म्हणून झळकणार आहे. वास्तव स्थळी चित्रपटाचे चित्रीकरण करणे शक्य नसले तरी देशातील पहिले कोळसा खाणीचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे ‘गुंडे’चे चित्रीकरण करण्यात आले आहे. हा चित्रपट १९७०च्या काळातील कथानक दाखविणार आहे.
१९७१ साली झालेल्या भारत-बांगलादेश युद्धानंतर बिक्रम (रणवीर सिंग) आणि बाला (अर्जुन कपूर) हे १२ वर्षे वयाचे मित्र कोलकाताला पळून येतात आणि कालांतराने कोळसा माफिया बनतात. त्यांना आव्हान देण्यासाठी एसीपी सत्यजित सरकार (इरफान खान) सज्ज होतो. याच वेळी नंदिता ही कॅब्रे डान्सर बिक्रम व बालाच्या आयुष्यात येते, असे थोडक्यात या चित्रपटाचे कथानक आहे. कोळसा माफिया बनल्यानंतर केवळ राणीगंज परिसरातच नव्हे तर संपूर्ण कोलकातामध्येही बिक्रम आणि बाला यांची दहशत असते. अर्थात ते गुंड असले, गुन्हेगारीचे बादशहा असले तरी नायक आहेत हे प्रेक्षकांनी विसरता कामा नये. हिंदी मसालेदार आणि अर्थातच गल्लापेटीची गणिते लक्षात घेऊनच आदित्य चोप्राने निर्मिती केली आहे.
दिग्दर्शक अली अब्बास जफर यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी यशराज फिल्म्सच्याच ‘मेरे ब्रदर की दुल्हन’ या चित्रपटाद्वारे जफर यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. कोणतीही फिल्मी पाश्र्वभूमी नसताना डेहराडूनच्या अली अब्बास जफर यांनी यशराज फिल्म्ससारख्या नामांकित बॅनरमध्ये शिरकाव मिळवून पहिल्या चित्रपटापूर्वी अनेक चित्रपटांच्या लेखन-दिग्दर्शनात संजय गधावी आणि विजय कृष्ण आचार्य यांचे साहाय्यक म्हणून काम केले आहे. यशराज फिल्म्स बॅनरचा ‘गुंडे’ हा यश चोप्रा यांची संकल्पना व मार्गदर्शनातून साकारलेला चित्रपट असल्यामुळे आदित्य चोप्रा यांच्यासाठी महत्त्वाकांक्षी चित्रपट आहे.
चित्रपटाच्या शीर्षकाप्रमाणेच समाजातील नकारात्मक घटकाचा रुपेरी पडद्यावर गौरव करण्याच्या बॉलीवूड परंपरेतील हा आणखी एक चित्रपट म्हणता येईल. यशराज फिल्म्सचे चित्रपट म्हणजे भरपूर फिल्मीगिरी असणार हे गृहीत धरायला हरकत नाही. यश चोप्रा यांच्या चित्रपटांत प्रमुख कलावंतांप्रमाणेच संगीताला महत्त्व दिलेले असते. कोळसा माफियांच्या आयुष्यात संगीताला फारसे स्थान असण्याचे कारण नाही. म्हणूनच बहुधा प्रियांका चोप्राला कॅब्रे डान्सर दाखविले असावे. ‘गुंडे’मध्ये तब्बल १० गाणी असून जावेद अली व शदाब आफ्रिदी यांच्या आवाजातील ‘जश्न-ए-इश्का’ हे शीर्षकगीत डिसेंबर अखेरीस प्रदर्शित करण्यात आले आहे.
बऱ्याच कालावधीनंतर ‘मेल बॉण्डिंग’ असलेला, दोन नायक असलेला बिग बजेट असलेला चित्रपट हेच काय ते या चित्रपटाचे वैशिष्टय़ म्हणावे लागेल.
संग्रहित लेख, दिनांक 7th Feb 2014 रोजी प्रकाशित
यश चोप्रांचा ‘गुंडे’!
रणवीर सिंग मुळात बडबडय़ा असून अर्जुन कपूर तुलनेने शांत स्वभावाचा आहे. चित्रपटात दोघांना एकमेकांच्या स्वभावाच्या एकदम उलटय़ा व्यक्तिरेखा दिग्दर्शकाने दिल्या आहेत.
First published on: 07-02-2014 at 03:58 IST
TOPICSबॉलिवूडBollywoodसिनेमाCinemaहिंदी चित्रपटHindi Filmहिंदी मूव्हीHindi Movieहिंदी सिनेमाHindi Cinema
+ 1 More
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Yash chorpas gunday