ज्येष्ठ संगीतकार, गीतकार यशवंत देव यांचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाची माहिती मिळताच अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली अर्पण केली. यात सुप्रसिद्ध कवी कुमार विश्वास यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून आदरांजली अर्पण केली आहे.

कुमार विश्वास यांनी ‘शुभ्र तुरे माळून आल्या…’ हे गाणं ट्विट करत यशवंत देव यांना मराठीमध्ये आदरांजली अर्पण केली आहे. विशेष म्हणजे हे गाणं ज्येष्ठ गायक सुधीर फडके यांनी गायलं असून यशवंत देव यांचंच संगीत त्याला लाभलं आहे. त्यासोबतच कुमार विश्वास यांनी या गाण्याची लिंकदेखील शेअर केली आहे.

यशवंत देव यांच्या निधनामुळे कलाविश्वात शोककळा पसरली असून संगीत क्षेत्रातील ‘देव’ हरपला अशी प्रतिक्रिया उमटत आहे. यशवंत देव यांनी ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी’, ‘दिवस तुझे हे फुलायचे’, ‘तिन्ही लोक आनंदाने’, ‘जीवनात ही घडी’, ‘स्वर आले दुरुनी’, ‘असेन मी नसेन मी’, ‘अखेरचे येतील माझ्या…’ अशी अनेक गाणी भावसंगीत विश्वाला दिली आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, कुमार विश्वास हे नावाजलेले कवी असून त्यांनी आजवर अनेक काव्यरचना केल्या आहेत. कुमार विश्वास हे कायमच त्यांच्या कवितांसाठी आणि वक्तव्यांसाठी चर्चेत येत असतात.  कुमार विश्वास हे अण्णा हजारेंच्या आंदोलनामुळे प्रेरीत झाले व नंतर अरविंद केजरीवास यांच्यासह त्यांनी  आम आदमी पक्षाच्या माध्यमातून राजकारणातही ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला.