अभिनेत्री आणि बिग बॉस ९ ची स्पर्धक युविका चौधरीला जातिवाचक शब्दांचा वापर करणे चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी युविकाला हरियाणामधील हांसी पोलीस स्टेशनमध्ये तपासासाठी बोलवण्यात आले होते. या तपासादरम्यान पोलिसांनी तिला औपचारिकरित्या अटक करत तीन तास कसून चौकशी केली. मात्र यानंतर काही वेळाने तिची जामीनावर सुटका करण्यात आली.

नेमकं प्रकरण काय?

रोडिस् फेम प्रिन्स नेरुलाची पत्नी अभिनेत्री युविका चौधरी ही नेहमीच काही ना काही कारणामुळे चर्चेत असते. २५ मे रोजी युविकाने एक व्हिडीओ ब्लॉग शेअर केल होता. या व्हिडीओत युविकाचा पती प्रिन्स एका खुर्चीत बसलेला दिसतोय. तो हेअर स्टाईल करत असताना युविका हा व्हिडीओ शूट करत होती. समोर आरसा असल्याने युविका व्हिडीओ शूट करताना स्पष्ट दिसतेय. यावेळी ती नेहमी व्हिडीओ शूट करताना मला छान तयार होता येत नाही असं बोलतेय. “नेहमी मी व्लॉग बनवते. तेव्हा मी का नेहमी **** सारखी येऊन उभी राहते. मला वेळचं मिळतं नाही की मी स्वत: ला व्यवस्थित दाखवू शकेन. मला खूप वाईट वाटतंय आणि हा मला व्लॉगसाठी वेळ देत नाही.” असं ती यात म्हणतेय. या व्हिडीओच्या सुरुवातीलाच युविकाने जातिवाचक शब्दांचा उल्लेख केला होता.

युविकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून यानंतर नेटकरी तिच्या अटकेची मागणी केली होती. अनेक नेटकऱ्यांनी ट्विट करत युविकाला अटक करा, असे सांगितले होते. त्यामुळे ट्विटरवर देखील #ArrestYuvikaChoudhary हा हॅशटॅग ट्रेंड होत होता. विशेष म्हणजे अनेक नेटकऱ्यांनी विविध मीम्स शेअर करत संताप व्यक्त केला होता.

पोलिसात तक्रार दाखल

तिच्या या व्हिडीओनंतर दलित हक्कांसाठी लढणारे समाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी तिच्याविरुद्ध एससी-एसटी कायद्याअंतर्गत हरियाणाील हांसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर तिने तिच्याविरुद्ध दाखल झालेला खटला रद्द करण्यासाठी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र न्यायालयाने तिची ही याचिका फेटाळली. यानंतर तिने विशेष न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्जही केला होता. मात्र तोही न्यायालयानेही फेटाळला होता. यानंतर उच्च न्यायालयाने तिला अटकपूर्व जामीन मंजूर करत तपासाला सहकार्य करण्याचे आदेश दिले होते.

न्यायालयाच्या आदेशानंतर चौकशीसाठी उपस्थिती

उच्च न्यायालयाच्या या आदेशानुसार सोमवारी १८ ऑक्टोबरला युविका हांसी पोलीस ठाण्यात हजर झाली. यावेळी तिच्यासोबत 10 बाउन्सर आणि तिचा पती प्रिन्स नरुलाही उपस्थित होता. यानंतर पोलिसांनी युविकाला अटक करत तिची चौकशी केली. यानंतर काही काळानंतर जामीनपत्र भरून जामीन मंजूर करण्यात आला.

याप्रकरणी डीसीपी विनोद शंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, युविकाला अटक करण्यात आली आहे. तिने यावेळी तपासात पूर्ण सहकार्य केले. तसेच यापुढे गरज भासल्यास पोलिसांकडून तिला पुन्हा चौकशीसाठी बोलवले जाईल, असे त्यांनी सांगितले.