लॉकडाउनच्या काळात देशवासीयांनी घराबाहेर पडू नये म्हणून दूरदर्शन वाहिनीवरील सर्व लोकप्रिय कार्यक्रम पुन्हा एकदा सुरु करण्यात आले आहेत. सरकारच्या या निर्णयाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘शक्तिमान’, ‘रामायण’, ‘महाभारत’ यांसारख्या सुपरहिट मालिकांच्या पुर्नप्रक्षेपणामुळे दूरदर्शनच्या लोकप्रियतेत पुन्हा एकदा कमालीची वाढ झाली आहे. दूरदर्शनची वाढत जाणारी टीआरपी लक्षात घेऊन आता झी टीव्हीने देखील ‘हम पाच’ ही सुपरहिट मालिका पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

विनोदाचे बादशाह अशोक सराफ यांच्या दमदार कॉमेडीमुळे सुपरहिट झालेली ‘हम पाच’ ही मालिका पुन्हा सुरु होत असल्यामुळे प्रेक्षक उत्साही आहेत. या मल्टिस्टारर मालिकेत प्रिया तेंडुलकर, शोमा आनंद, विद्या बालन, राखी टंडन, जतिन कनकिया अशा अनेक नामवंत कलाकारांनी काम केले होते. मात्र अशोक सराफ या मालिकेचे मुख्य आकर्षण ठरले होते. पाच मुलींचा एक पिता या भूमिकेत त्यांनी कमाल केली होती. त्यामुळेच या मालिकेचे नाव ‘हम पाच’ असे ठेवण्यात आले होते.

‘हम पाच’ व्यतिरिक्त ‘क़ुबूल है’, ‘डान्स इंडिया डान्स’, ‘सा रे गा मा पा लिटिल चँप’ या मालिका देखील पुन्हा एकदा सुरु करण्यात आल्या आहेत. अनेक जुन्या लोकप्रिय कार्यक्रमांचे पुर्नप्रक्षेपण सुरु केल्यामुळे प्रेक्षकांमध्ये आनंदाचे वातावर निर्माण झाले आहे. प्रेक्षक सोशल मीडियाव्दारे आपल्या आठवणी व्यक्त करत आहेत.