21 September 2018

News Flash

७४. व्यवधान.. अवधान

रामावर प्रेम करणं म्हणजे जगावरच प्रेम करणं तर आहे, अशा भ्रामक समजुतीतून ध्येय तिथेच घसरतं.

श्रीधर स्वामी यांच्या पत्रातली जी वाक्य गेल्या वेळी पाहिली ती सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी। दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।। या चरणाच्या अर्थबोधासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. स्वामी म्हणतात की, ‘‘कोणाचेही व्यवधान मनास नसलेले उत्तम. ध्येयावरच लक्ष्य सदोदित स्थिर ठेवावे.’’ रामाशिवाय अर्थात शाश्वत परमतत्त्वाशिवाय किंवा ते तत्त्व हेच ज्यांचं जीवन आहे त्या सद्गुरुंशिवाय दुसरं कशाचं अवधान असणं हेच अध्यात्माच्या मार्गातलं एकमात्र व्यवधान आहे! असं व्यवधान जर असेल तर मनाला दुसरीकडची ओढ असणारच. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, ‘‘कोणावरही थोडे जास्त प्रेम ठेवले की मन तेथेच ध्येय जोडून पुन्हा पुन्हा जाऊ लागते. बारके छिद्रही पात्र रिकामे करते, हे लक्षात ठेवावे!’’ जडभरताची कथा प्रसिद्धच आहे. संपूर्ण राज्य सोडून जो राजा वनात तपश्चर्येला गेला तो एका आईविना पोरक्या झालेल्या पाडशाच्या प्रेमात पडला. त्या पाडसाचा सांभाळ करण्यात करुणा, भूतदया, अनुकंपाच तर आहे, या भावनेनं त्याच्यावर वात्सल्याचा वर्षांव करण्यात राजा दंग झाला. मग मूळ जे ध्येय होतं, ते आपोआप बाजूला पडत गेलं. ध्यानाला बसलं तरी पाडसाचंच ध्यान, जपाला बसलं तरी पाडसाकडेच लक्ष.. संपूर्ण राज्यवैभवाचा ज्यानं त्याग केला तो त्याग एका लहानशा पाडसानं खुजा ठरवला! तेव्हा ‘सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी’ हेच जर खरं ध्येय असेल, तर त्यावरच लक्ष सदोदित केंद्रित असलं पाहिजे. आंतरिक मोहातून जर कुठे थोडं अधिक प्रेमाभासानं गुंतलं गेलं तर तिथंच मन वारंवार खेचलं जातं. मग रामावर प्रेम करणं म्हणजे जगावरच प्रेम करणं तर आहे, अशा भ्रामक समजुतीतून ध्येय तिथेच घसरतं. मग रामाची किंवा सद्गुरूंची प्रीती ही बोलण्यापुरती उरते आणि जगाच्या प्रेमानं जगणं व्यापून जातं. अशाश्वतालं गुंतणं हे शाश्वत सुख थोडंच थोडंच देणार? मग असं अशाश्वतात गुंतलेलं मन अपेक्षाभंगाचं दु:ख भोगतं, तरी शहाणं होत नाही. तेव्हा मनानं शहाणं होण्यासाठी अशा प्रसंगांचा सांडशीसारखा वापर करून मनाला अलगद भ्रम-मोहाच्या व्यवधानातून सोडवणं म्हणजेच दु:खाची स्वयें सांडि जीवीं करावी।। हे साधणं! आणि या मनाला सद्गुरूप्रेमाचं अवधान आणणं म्हणजेच सदा सर्वदा प्रीति रामीं धरावी। हे साधणं!! आता मनानंच निर्माण केलेल्या दु:खांचं खरं स्वरूप, त्यांचा फोलपणा मन या अभ्यासानं जितकं अंतर्मुख होत जाईल तितका उकलू लागेल. त्या स्वत:च निर्माण केलेल्या दु:खांतून मनही मग हळूहळू फटके खात खात का होईना शहाणं बनून बाहेर पडू लागेल, पण शरीराला व्याधींपायी किंवा प्रतिकूल परिस्थितीपायी होणारी दु:खं ही थोडीच मानसिक किंवा काल्पनिक असतात, असा प्रश्न आपल्याला पडतो आणि तो स्वाभाविकही भासतो. म्हणूनच ‘‘देहेदु:ख हें सूख मानीत जावें। विवेकें सदा स्वस्वरूपी भरावें।।’’  हे चरण आपल्याला आचरणात आणता येणं अशक्यच वाटतं. इथंही पुन्हा श्रीधर स्वामी यांच्याच पत्रातील बोधाचा आधार घ्यावासा वाटतो. एका पत्रात ते म्हणतात, ‘‘नित्य निर्विकार सुशांत व शाश्वत आनंदरूपाकडे दृष्टी फिरवून प्रारब्धाचे दिवस गोड करून घ्यावेत!’’ (श्रीधर स्वामींची शतपत्रे, पत्र ६७वे). काय वाक्य आहे.. प्रारब्धाचे दिवस गोड करून घ्यावेत!! नित्य निर्विकार सुशांत व शाश्वत आनंदरूप अर्थात राम! त्याकडे दृष्टी फिरवायची म्हणजे प्रारब्धात रूतलेली दृष्टी काढायची.. इतकंच नाही तर त्या प्रारब्धामुळे जे देहदु:ख वाटय़ाला आलं आहे तेसुद्धा गोड मानून घ्यायचं. आता हे गोड मानून घेणं विवेकाशिवाय का साधणार आहे? समर्थही म्हणतात,  देहेदु:ख हें सूख मानीत जावें। विवेकें सदा स्वस्वरूपी भरावें!!

HOT DEALS
  • Sony Xperia XA Dual 16 GB (White)
    ₹ 15940 MRP ₹ 18990 -16%
    ₹1594 Cashback
  • Apple iPhone 7 32 GB Black
    ₹ 39750 MRP ₹ 52370 -24%
    ₹6500 Cashback

चैतन्य प्रेम

First Published on April 19, 2016 5:08 am

Web Title: disruption and attention philosophy