सज्जनांचं अंत:करण प्रसन्न होईल, असं कर्म कोणतं असणार? अट्टल दारुडय़ाला दुसरा दारुडा भेटला कीच आनंद होणार.. तसा जो भगवत्प्रेमात आकंठ बुडाला आहे अशा सज्जनाला भगवत्प्रेमासाठी तळमळणारा, त्यासाठीच प्रयत्न करणारा आणि त्यासाठीच जीवनाचा अधिकाधिक वेळ सत्कारणी लावणारा साधकच आवडणार ना? तेव्हा मना चंदनाचेपरी त्वां झिजावें। जगासाठी, जगातील कर्तव्यांच्या पूर्तीसाठी चंदनासारखं झिजायचं आहे, पण, परी अंतरीं सज्जना नीववावें।। ते सारं करताना त्या कर्मात आसक्त मात्र व्हायचं नाही, जगाकडून स्तुतीची अपेक्षा मनात कणमात्रही उत्पन्न होऊ द्यायची नाही. उलट सज्जनांच्या मनाला कशानं आनंद मिळेल, याचा विचार करीत आपल्या वृत्तीकडे, मनोवेगांकडे, ऊर्मीकडे बारकाईनं लक्ष देत स्वत:ला सुधारायचा प्रयत्न करीत राहीलं पाहिजे. स्वत:ला सुधारणं म्हणजे टिटवीनं समुद्र गिळून टाकण्यासारखंच अशक्य! पण तरीही टिटवीच्या प्रयत्नसातत्यानं प्रसन्न होऊन भगवंतच सरसावले.. तसा स्वसुधारणेचा अभ्यास जो अत्यंत प्रामाणिकपणे करतो त्याचा तो अभ्यास पाहूनच सज्जनांचं मन संतोषतं आणि ते त्याच्या सुधारणेची प्रक्रिया वेगानं सुरू करतात. आता स्वत:ला सुधारण्याचा अभ्यासही तेवढाच कठीण असतो. कारण साधनेनं मन हळवं होत चाललं असतं आणि सुख-दु:खाच्या कल्पना बदलत असल्या तरी भौतिकातील सुख-दु:खाची जाणीव सुप्तपणे तग धरून टिकण्याची धडपड करीत असते. त्यामुळेच मनोबोधाचा पुढचा श्लोक मोठा विशेष आहे. हा श्लोक असा :
नको रे मना द्रव्य तें पूढिलांचें।
अति स्वार्थबुद्धीन रे पाप सांचे।।
घडे भोगणें पाप तें कर्म खोटें।
न होतां मनासारिखें दु:ख मोठें।।९।।
या श्लोकाचा प्रचलित अर्थ आणि मननार्थ यात काहीसा भेद आहेच. याचा प्रचलित अर्थ आपण जाणतो, तो असा – हे मना, पुढिलांचे म्हणजे दुसऱ्यांचे द्रव्य नको. परद्रव्याचा अभिलाष धरू नकोस. अतिस्वार्थबुद्धीने पाप संचय होत जातो. त्या पापाची फळं भोगावी लागतात. ज्या कर्मानी पापभोग वाटय़ास येतात ते कर्मच खोटं आहे. त्याज्य आहे. उलट मनासारखं घडलं नाही तर होणारं दु:खं फार मोठं असतं!
आता साधकासाठीचा मननार्थ पाहू. बेळगावचे काणेमहाराज यांनी ‘पुढिलांचे’ या शब्दाचा फार वेधक अर्थ सांगितला आहे. मनाला पुढिलांचे कोण? तर बुद्धी आणि अहंकार! या आधारावर काणेमहाराजांनी सांगितलेला अर्थ असा – ‘‘ हे मना, पुढिलांचे म्हणजे बुद्धी व अहंकार यांच्या मिश्रणाचे द्रव्य म्हणजे साधनसंपत्ती अशी जी बुद्धी ती अतिशय स्वार्थी म्हणजे केवळ स्वत:चेच सुख पाहणारी, अप्पलपोटी असल्यामुळे पाप म्हणजे असद्वृत्ती दुणावते. असद्वृत्तीचा संबंध भोग घडल्यामुळे अयोग्य कर्माकडे बुद्धी जाते. तसे होऊनही, म्हणजे ती बुद्धी अयोग्य कर्माकडे जाऊनही मनाजोगे न झाल्याने मन दु:ख सागरात गटांगळ्या खाते.’’ आता काणेमहाराज यांनी सांगितलेल्या या गूढार्थाचं बोट पकडून आपण साधकासाठीचा मननार्थ जाणून घेऊ. पुढिलांचे म्हणजे बुद्धी व अहंकाराचे द्रव्य, हा काणेमहाराजांचा अर्थ भिडणारा आहे खराच. पण खरं पाहाता मन, चित्त, बुद्धी आणि अहंकार हे अंत:करणचतुष्टय़ असलं तरी मनच या चारही रूपांत विलसत असतं. ते मनन करतं तेव्हा मन, चिंतन करतं तेव्हा चित्त, विचार करतं तेव्हा बुद्धी आणि देहबुद्धीच्या स्फुरणानं व्यापून जातं तेव्हा अहंकार रूपात जाणवतं. प्रत्यक्षात चित्त, बुद्धी आणि अहंकार यांच्या नाडय़ा मनाच्याच हातात असतात. मनापुढे या तिघांची शक्ती तोकडी आहे!
–चैतन्य प्रेम