14 August 2020

News Flash

४११ (अ). अहिल्या व आत्मोद्धार!

समर्थ रामदास विरचित ‘मनोबोध’ अर्थात ‘श्रीमनाचे श्लोका’तील १२५ व्या श्लोकाकडे आपण वळूच.

 

समर्थ रामदास विरचित ‘मनोबोध’ अर्थात ‘श्रीमनाचे श्लोका’तील १२५ व्या श्लोकाकडे आपण वळूच.गांत बुधवारी वृत्तपत्र प्रकाशित होणार नसल्यानं या श्लोकाचं विवेचन गुरुवारी करू. त्यामुळे आज राम अवताराचा मागोवा घेणाऱ्या १२३ व्या श्लोकाचा काही सत्पुरुषांनी लावलेला अन्वयार्थ जाणून घेऊ. आजच्या भागाचा अनुक्रमांकही ४११ अ असा आहे याची नियमित वाचकांनी नोंद घ्यावी. ‘अहल्येसती लागि आरण्यपंथें। कुडावा पुढें देव बंदीं तयांतें। बळें सोडितां धाव घाली निशाणीं। नुपेक्षी कदा राम दासाभिमानी॥’ या १२३ व्या श्लोकाचा भाऊसाहेब उमदीकर महाराज काय अर्थ लावीत असत ते प्र. ह. कुलकर्णी यांनी ‘मनोबोधामृत’ या पुस्तकात नमूद केलं आहे. ते म्हणतात, ‘‘विषयांचे सेवन करून अरण्याची वाट धरलीस. मग तीर्थयात्रा करून देव मिळेल असं समजून तो मार्ग स्वीकारलास. प्रत्यक्षात या शरीरात आत्मा बंदिस्त झाला आहे. नामस्मरणाच्या बळाने आत असलेला हा आत्मा बंधनमुक्त होऊन बाहेर येतो. त्याची खूण दिसू लागते.’’

बेळगावचे काणे महाराज यांनी या श्लोकाचा अर्थ उलगडताना म्हटले आहे – ‘‘हे मना, उपनिषदांच्या मार्गाने जाऊन, शुद्ध व दिव्य झालेली अशी ही तेजस्वी अहिल्यारूप बुद्धी, तिने आत्मनिश्चय केल्यावर, आत्मनिश्चय करूनही आत्मारामाच्या नामात लीन झाल्यावर तिला आत्मज्ञान प्राप्त झाल्यामुळे असत् वासनेच्या बंदीखान्यात खितपत पडलेल्या सत् वासना मोकळ्या झाल्या. त्यांना संरक्षण मिळाले. अशा मोकळ्या झालेल्या वासना तेच देव म्हणजे सद् वासना. यांनी प्रभू आत्माराम हीच निशाणी म्हणजे खूण, साध्य असे नामस्मरणाचा जयघोषरूपी घाव अंतर नगाऱ्यावर पडताच त्याचा प्रचंड आवाज अंतर त्रिलोकात दुमदुमला. असा हा दासाभिमानी आत्माराम तुला कधीही अंतर देणार नाही, तुझी उपेक्षा करणार नाही. म्हणून तू त्याचे नामस्मरण कर.’’ त्यांच्या सांगण्याचा भाव असा असावा की, हे मना, बुद्धी जोवर शुद्ध होत नाही तोवर अरण्याच्या अर्थात विरक्तीच्या वाटेनं खरी वाटचाल सुरू होत नाही.  मनाची अशी अवस्था येऊ शकते की कोणत्याही साधनेचीही गरज वाटेनाशी होते!  आत्मनिर्भर स्थिती येऊनही जेव्हा ही तेजस्वी बुद्धी नामात लीन होते त्यानंतर काय साधतं याचं वर्णन काणे महाराज पुढे करतात की, या बुद्धीच्या योगे आत्मज्ञान प्राप्त होतं! जोवर अज्ञान होतं तोवर जे असत् आहे तेच सत् वाटत होतं. जे अशाश्वत आहे तेच शाश्वत वाटत होतं. जे सत् आहे त्याची उपेक्षा सुरू होती. आत्मज्ञानानं सत् काय आणि असत् काय, हे समजलं. हे समजणं म्हणजे नुसतं शब्दानं नाही बरं का. ‘आगीला हात लावला की चटका बसतो,’ हे समजलं, असं केव्हा म्हणता येईल? जेव्हा मी आगीला हात लावणं बंद करीन तेव्हाच! ‘जग मिथ्या आहे,’ असं तोंडानं नुसतं म्हणून जर मी त्याच जगात आशेच्या लाळघोटेपणानं वावरत असीन, तर त्याला ज्ञान कसं म्हणायचं? तेव्हा खरं आत्मज्ञान प्राप्त होताच असत् वासनांची पकड संपते. सत् वासना मोकळ्या होतात. आत्मस्थ आधार अर्थात आत्माराम सदोदित आपल्या पाठीशी आहे, हे जाणवू लागतं. मग या सत् वासना जेव्हा कृतीत उतरू लागतात तेव्हा त्याच ‘देव’ होतात! देव म्हणजे देणारा. जो काही दाता आहे तो आतच आहे. अहो, या जगात वावरता येईल, असं जे चतन्य माझ्या आत विद्यमान आहे त्या चतन्य तत्त्वापेक्षा मोठा दाता कुणी आहे का? परमात्म तत्त्व ही या आत्मतत्त्वाच्या अस्तित्वाची खूण आहे. त्या परम तत्त्वाच्या नामरूपाचा उच्चाररूपी घाव अंत:करणाच्या नगाऱ्यावर पडला की तो संपूर्ण त्रिलोकात दुमदुमतो. म्हणजेच अंत:करणातील सत्, रज आणि तम भावात तो व्याप्त होतो! इतक्या सूक्ष्म पातळीपर्यंत जो परमात्मा रक्षण करतो तो दासाची उपेक्षा कधीच करीत नाही!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 1:32 am

Web Title: samarth ramdas philosophy 283
Next Stories
1 ४११. दशावतार : ९
2 ४१०. दशावतार : ८
3 ४०९. दशावतार : ७
Just Now!
X