21 September 2020

News Flash

१२७. जेथे जातो तेथे..

परमात्मा सदोदित जवळ असणे हे सत्पुरुषाचं रहस्य आहे, असं श्रीगोंदवलेकर महाराज यांचं वचन आहे.

परमात्मा सदोदित जवळ असणे हे सत्पुरुषाचं रहस्य आहे, असं श्रीगोंदवलेकर महाराज यांचं वचन आहे. रामाचं अर्थात सद्गुरूचं हे पुढे-मागे जोडणंच समर्थाना अभिप्रेत आहे. तुकाराम महाराजही म्हणतात ना? जेथे जातो तेथे तू माझा सांगाती.. जगण्यातल्या प्रत्येक व्यवहारात मग सद्गुरू जोडीनं चालू लागतो. प्रत्येक प्रसंगात तो सावरतो. याची सुरुवात होते ती साध्या-सोप्या-सहज भासणाऱ्या नामानंच. संकुचित जिवाला व्यापक करणारं, जगाच्या प्रभावातून त्याला बाहेर काढणारं आणि परमतत्त्वाच्या जाणिवेत अखंड ठेवणारं नाम हे प्रारंभिक वाटचालीत साधकाच्या आटोक्यातलं वाटतं. अर्थात सद्गुरूप्रदत्त साधनात सद्गुरूंचीच शक्ती कार्यरत असते त्यामुळे सद्गुरूप्रदत्त कोणतंही साधन हे साधकाला करता येईल, असंच असतं. तरीही नामसाधन सार्वत्रिक आहे. भगवंताच्या रूपाबद्दल प्रत्येक धर्मात मतांतरं आहेत, पण नाममहात्म्याबद्दल एकवाक्यता आहे. असो. साधनपंथावर वाटचाल करू लागला की साधक नामाबद्दल भरभरून बोलतो, पण नाम काही भरभरून घेत नाही! त्यामुळेच समर्थ सांगत आहेत की कोणत्याही प्रकारे नामाचा कंटाळा करू नकोस, वीट मानू नकोस. कारण या नामानंच सद्गुरूंचा सततचा आंतरिक सहवास लाभणार आहे. तुझ्या प्रत्येक पावलासोबत त्यांचं अस्तित्व जाणवणार आहे. मग पुढचे दोन्ही चरण म्हणजे नामप्रभावाचा चरमोत्कर्ष सांगणारे आहेत. समर्थ म्हणतात.. सुखाची घडी लोटतां सूख आहे। पुढें सर्व जाईल कांहीं न राहे।। सुखाची घडी लोटल्यावर सुखच आहे! या चरणांचा अर्थ बरेचजण असा घेतात की, जीवन अशाश्वत आहे. आज सुख असेल, तर पुढच्याच क्षणी दु:ख वाटय़ाला येईल, यात शंका नाही. अखेरीस तर काहीच राहणार नाही. या श्लोकाचा जो गूढार्थ भासतो तो मात्र पहिल्या दोन चरणांशीच सुसंगत आहे. पहिल्या चरणात समर्थ सांगतात की, साधनाचा कंटाळा न करता नाम घेत जा. दुसऱ्या चरणात सांगतात, असं केलं नाहीस तर सद्गुरूंचा आंतरिक संग कसा लाभेल? आणि मग सद्गुरूंचा सदोदित आंतरिक संग घडविणारं नाम होऊ लागलं की अशा नामधारकाची स्थिती काय असते हे तिसरा चरण सांगतो.. सुखाची घडी लोटतां सूख आहे।  कसं आहे पहा, सुरुवातीला नामात पूर्ण लीन झालो नसलो तरी नामाची गोडी वाढू लागली की साधनेत मन रममाण होऊ लागतं. साधनेच्या काळात सुरुवातीला उठणारं विचारांचं वादळही हळूहळू शमू लागतं. मन शांत आणि स्थिर झाल्यासारखं वाटतं. साधनेचा काळ मोठा सुखाचा भासतो. एकदा साधना झाली आणि साधक जगाच्या व्यवहारात आला की मात्र मनाची ती स्थिती टिकत नाही. जगण्यातील चढउतारानं मन अस्थिर होऊ लागतं. पण ज्याला खऱ्या अर्थानं नामात तल्लीनता येते, सद्गुरूंशी अखंड आंतरिक ऐक्य टिकू लागतं त्याच्यापुरता मात्र साधनेचा काळ आणि जगात वावरण्याचा काळ यातला भेदच संपून जातो. त्याचं जगणं हीच साधना होऊ लागते. मग साधना करताना जो आनंद तो उपभोगत होता तोच आनंद जगात वावरतानाही तो पदोपदी भोगत असतो. भाऊसाहेब महाराज उमदीकर यांच्या विवरणानुसार प्र. ह. कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘मनोबोधामृत’ या ग्रंथातही हाच अर्थ मांडला आहे. त्यात म्हटलं आहे की, ‘‘निरंतर नामस्मरणाने आनंद आनंदवो। निजसुखानंद आनंदवो। म्हणजे आनंद आनंद हा निजसुखाचा आनंद आहे, असे म्हटल्याप्रमाणे आनंदाचे क्षण जाताच पुन्हा आनंदच मिळतो.’’ म्हणजेच जीवनातलं द्वैतच ओसरू लागल्यानंतर सुखानंतर दु:ख ही द्वैताची साखळीही तुटते आणि सुखानंतरही सुखच अनुभवास येऊ लागतं!

-चैतन्य प्रेम

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2016 3:34 am

Web Title: samarth ramdas philosophy 33
Next Stories
1 १२६. कवच
2 १२५. नामोच्चार
3 १२४. आंतरिक घडण : २
Just Now!
X