विनायक परब – @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गणेश किंवा गणपती ही देवता नेमकी समाजामध्ये केव्हा अस्तित्वात आली आणि कशा प्रकारे विकास पावत गेली हे एक जागरूक समाजघटक म्हणून आपण सर्वानीच समजून घेणे आवश्यक आहे. गेली आठ वर्षे गणेश विशेषांकाच्या निमित्ताने ‘लोकप्रभा’तर्फे गणेशाचा आणि त्याच्या प्रथा- परंपरांचा ग्रांथिक, पुरातत्त्वीय आणि मानवी इतिहासातील विविध संकल्पनांचा विकासाच्या अंगाने शोध अव्याहत सुरू आहे. यंदाचे वर्षही त्याला अपवाद नाही. गणेशाचा सर्वात पहिला दृश्य संदर्भ सापडतो तो इसवी सनपूर्व शतकामध्ये. हस्तिनायनांच्या संदर्भात थेट अफगाणिस्तानामध्ये हा संदर्भ सापडतो. कधी नाण्यांवर तर कधी थेट गार्देजच्या मशिदीमध्ये. वेदांमधील ब्रह्मणस्पती हा गणपतीच असल्याचे काही अभ्यासकांचे मत आहे. मात्र ग्रांथिक पुराव्याच्या पुष्टय़र्थ फारसे संदर्भ सापडत नाहीत. सुरुवातीस येणारा गणपती हा महाविनायक किंवा विनायक या नावाने येतो. त्याचे ग्रांथिक संदर्भ सापडतात. मात्र विनायकाचा गणेश नेमका केव्हा झाला, त्याची उकल नेमकी होताना दिसत नाही. गणपती ही साधारणपणे आठव्या शतकानंतर आजपर्यंतची लोकप्रिय राहिलेली अशी देवता दिसते. मात्र या देवतेचा व्यवस्थित अभ्यास झालेला दिसत नाही. या देवतेसंदर्भातील अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. त्याचा शोध नव्याने अनेक विद्याशाखांच्या एकत्रित अभ्यासाच्या माध्यमातून घेण्याची वेळ आता येऊन ठेपली आहे.

गणपतीच्या दैवतप्रवासातील काही महत्त्वाचे संदर्भ सापडतात ते अधिक प्रश्न घेऊनच येतात. बौद्ध शिल्पकृतींमध्ये गजमुखी यक्ष पाहायला मिळतो. औरंगाबाद लेणींमध्ये बुद्धासोबत असलेला गणपती आणि बौद्ध लेणींमध्ये असलेला लेण्याद्री आपले प्रश्न अधिकच गहन करतात.

आठव्या शतकानंतर गणपतीचे आणि गाणपत्य या त्याच्या स्वतंत्र संप्रदायाचे प्राबल्य वाढलेले दिसते. त्या सुमारास प्रमुख असलेल्या िहंदू, बौद्ध आणि जैन सर्वच धर्मामध्ये तंत्रमार्गाचे प्राबल्य वाढलेले होते. त्यात गणेश किंवा गणपती ही तांत्रिक देवता म्हणून समाविष्ट होती. नंतरच्या काळात बौद्ध धर्माच्या ऱ्हासानंतर येथील बौद्ध गेले कुठे, असा प्रश्न दीर्घकाळ पडलेला होता. त्या प्रश्नाला पन्हाळेकाजीच्या लेणींनी उत्तर दिले. बौद्धांनी स्वीकारलेला नाथ संप्रदाय हे त्यावरील पुरातत्त्वीय उत्तर होते. त्याचे पुरावे सापडले. मात्र तरी गणेश आणि दत्त यांचे सख्य कसे काय आणि नेमके कुठे व कसे जुळले याचे उत्तर आजही अनुत्तरितच आहे. हा तोच कालखंड आहे की, ज्या वेळेस गाणपत्य संप्रदायाने पाय रोवले आणि गणपती हे प्रधान दैवत म्हणून पुढे आले. त्यामुळेच पन्हाळेकाजीच्या लेणींमध्ये गणपतीच्या दोन्ही बाजूंस सरस्वती आणि लक्ष्मी अशी लोकप्रिय दैवते विराजमान झालेली दिसतात. ज्ञानेश्वर असोत किंवा मग तुकाराम अथवा रामदास; मध्ययुगातील संतरचनेत गणेशवंदना प्रामुख्याने पाहायला मिळते. शिवाय दुसरा विशेष म्हणजे या वंदनेत येणारा गणपती हा चल आणि क्रियाशील आहे, तो स्थितीज नाही. याचा संबंध तत्कालीन राजकीय आणि सामाजिक परिस्थितीशी आहे का, यावर विचार आणि अभ्यास दोन्ही होणे गरजेचे आहे. जैन धर्मातील गणपती लोकप्रिय असला तरी त्यावरही फारसा अभ्यास झालेला नाही. म्हणून त्यावरील एक वेगळा लेख या अंकात समाविष्ट केला आहे. शिवाय कलेच्या अंगाने व आग्नेय आशियातील गणपतीच्या विकासप्रक्रियेवरही या अंकात प्रकाश टाकला आहे. या विषयाचा सर्वागीण अभ्यास होईल त्याच वेळेस आपल्याला खऱ्या अर्थाने म्हणता येईल.. सकल मति प्रकाशु!