विनायक परब –  @vinayakparab / vinayak.parab@expressindia.com

गेल्या सुमारे महिन्याभरामध्ये महाराष्ट्रातील राजकारण ढवळून निघाले आहे. विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत. मात्र अद्याप त्या संदर्भातील अधिसूचनाही जारी झालेली नाही. तरीही राजकीय वातावरण मात्र तापू लागले आहे. केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्याही राजकारणामध्ये आजवर शरद पवार हे मोठे वजनदार नाव राहिले आहे. ४०-५० आमदार तर अगदी सहज निवडून आणण्याची क्षमता असलेला त्यांच्यासारखा दुसरा नेता नाही. दीर्घकाळ राज्याचे राजकारण त्यांच्यासभोवती फिरत राहिले आहे. मात्र गेल्या १५-२० दिवसांत त्यांनीच स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला गळती लागली आहे असे म्हणण्यापेक्षा खिंडार पडले आहे, असे म्हणणे हे परिस्थितीचे नेमके वर्णन ठरावे. शरद पवार यांची आजवरची कारकीर्द लक्षणीय राहिली आहे. आजवर आलेली अनेक आव्हाने त्यांनी अगदी सहज परतवून लावली आहेत. मात्र आता मिळालेले आव्हान नक्कीच सोपे नाही.

सध्या महाजनादेश यात्रेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर थेट पवार यांच्यावरच शरसंधान करून त्यांनी केलेल्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला आहे. मराठा आंदोलनानिमित्ताने पवार यांनी प्रामाणिक आंदोलकांच्या खांद्यावरून भाजपावर नेम साधण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपच मुख्यमंत्र्यांनी केला आहे. मात्र एवढय़ावरच ते थांबले नाहीत तर पवार यांचा डाव त्यांच्यावर उलटला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे मराठा समाजातील मोठे नेतेच आता राष्ट्रवादी सोडून भाजपामध्ये येत आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे.

शरद पवार यांचा एक विशेष हा त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भातील आहे. विषय उसाचा असो, साखरेचा किंवा शेतीचा. त्यांच्या अभ्यासाला तोड नाही. सर्व क्षेत्रांमधील नेमकी व अद्ययावत माहिती ते राखून असतात. शरद पवार यांना राजकारणातील अनेक जण चांगले ओळखून असल्याने त्यांच्यासोबतचे सर्वपक्षीय नेते मैत्री राखून असलेले दिसतात. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असतानाही पवार यांना कॅबिनेट दर्जा असलेले पद केंद्रात बहाल करण्यात आले. किंबहुना म्हणूनच विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील थेट बारामतीमध्येच जाऊन त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळताना पाहायला मिळाले. मात्र असे असले तरी आता परिस्थिती बदलली आहे. राजकारणाचे वारेही बदलले आहेत. आता परिस्थिती १९७८ सारखी राहिलेली नाही. ७८ साली पवार यांनी सुंदरराव सोळंके, सुशीलकुमार िशदे आणि दत्ता मेघे यांना हाताशी धरून सत्तांतर घडवले होते. नंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी १९८० साली पवार सरकारची बरखास्ती घडवून आणली. मात्र तेव्हापासून सुरू झालेला त्यांच्या राजकारणाचा अव्याहत प्रवास अनेक चढउतारांमध्येही अखंडच राहिला. त्यांना मिळालेली आव्हाने त्यांनी यशस्वीरित्या परतावून लावली.

मात्र आता परिस्थिती बदलली आहे. दीर्घकाळ त्यांच्यासोबत राहिलेले विश्वासू नेते अखेरीस सोडून चालले आहेत. शिवेंद्रराजे भोसले, सचिन अहीर, बबनराव पाचपुते आदींनी भाजपात प्रवेश केला आहे. गणेश नाईक तुलनेने उशिरा राष्ट्रवादीत आले. मात्र आता जाताना नवी मुंबईच्या सर्व नगरसेवकांसह संजीव नाईक भाजपाच्या दारी आले आहेत. सोडून गेलेल्यांना निवडणुकांमध्ये त्यांची जागा पाहायला मिळेल असे शरद पवार यांनी सांगितलेले असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीच्या गळती लागलेल्या बोटीतून मंडळी उडय़ा मारताना दिसत आहेत. पक्षांतर करणाऱ्या या सर्व मंडळींना घेऊन नवा भाजपा कोणत्या दिशेने जाणार याची कल्पना नाही, मात्र यानिमित्ताने शरद पवार यांच्या नेतृत्वाला प्रथमच थेट आणि मोठे आव्हान मिळाले आहे, हे खरे!