|| संजय मोने

अनेक वर्षांपूर्वी नाटकाच्या प्रयोगासाठी दौऱ्यावर गेलो होतो. नाव आठवत नाही इतकं ते नाटक सुमार होतं. त्याच्या लायकीइतकेच त्याचे ४०-४५ प्रयोग झाले. त्यात कोण कोण कलाकार होते त्यांची नावं काही मी सांगणार नाही. उगाच त्यांच्या सगळ्यांच्या नावावर अजून एक पडेल नाटक लागायला नको. (‘अजून एक’ हा शब्दप्रयोग जरा चुकीचा आहे; पण आता राहू दे.) रात्रीचा प्रयोग अपरात्री सुरू झाला. नेहमीप्रमाणेच. या बाहेरगावातल्या रसिक प्रेक्षकांच्या रसिकत्वाचा वन्ही इतक्या उशिरा कसा काय पेट घेतो आणि त्यांना तो अपरात्रीपर्यंत कसा काय धुमसता ठेवता येतो, देव जाणे! कलाकारांच्या डोळ्यांत झोप लख्ख दिसत असते. ती त्यांना भावदर्शन किंवा अभिनय म्हणून कशी चालवून घेता येते, कुणास ठाऊक? तर.. आमचं नाटक संपलं. आत येऊन तुरळक प्रेक्षकांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या. (मुळात सर्व मिळून प्रेक्षक तुरळकच होते. त्यातले पुन्हा तुरळक म्हणजे किती, ते ठरवा!) ‘आमच्या गावासारखे रसिक तमाम महाराष्ट्रात दुसरीकडे कुठेही नाहीत,’ असं त्यातल्या काही जणांनी बजावून सांगितलं. आमच्या सुमार नाटकाला आल्यामुळे आमच्यासाठी ते रसिकशिरोमणीच होते. मुळात नाटकाला लागलेली घरघर आम्हा कलाकारांना जाणवली होती. ऊसाच्या चरकात जसा पिळून पिळून शेवटच्या थेंबापर्यंत रस काढला जातो, तसं आमचा निर्माता ते नाटक पिळत होता. आता शेवटचा, आलंबिलं घालून काढलेला फेरा म्हणून त्या गावात प्रयोग होता. साहजिकच सगळे कलाकार ऊसासारखेच पिळून काढल्याच्या यातना चेहऱ्यावर वागवीत होते.

सगळे प्रेक्षक निघून गेले. कुणाच्या तरी स्मृतिप्रीत्यर्थ बांधलेल्या त्या रंगमंचाचा चौकीदार ‘काय पण दाखवतात आजकाल!’ अशी त्याआधी नाटक कळणाऱ्या टीकाकारांच्या संपूर्ण विरोधातली प्रतिक्रिया देऊन दारं बंद करायला लागला. आम्ही दोन-चार तरुण रंगकर्मी (बरा शब्द आहे नाही? विशेषत: पडेल नाटकाच्या अभिनेत्यांच्या नावामागे लागला तर अपयशाची लज्जा झाकायला तर फर्मासच.) उगाचच इकडे-तिकडे भटकत होतो. जेवण झालं होतं. काही वरिष्ठ नट आमच्यातल्या तरुण स्त्री-कलाकारांना आपल्या कविता ऐकवत होते. (कुणाच्या होत्या, देव जाणे!) एक-दोन वरिष्ठ स्त्री-कलावंत आपापसात नेमकं कोण वरिष्ठ आहे, हे एकमेकींना पटवून द्यायच्या खटपटीत गर्क होत्या. इतर काहीजण थोडय़ा अमलाखाली आपल्या व्यथा मांडत होते. आम्ही बाहेर भटकत असताना समोरच्या घरातून एक आवाज कानावर आला –

‘‘केशवराव! याद राखा.. एक पाऊल जरी पुढे टाकलंत तर! काय करताय तुम्ही? जरा भानावर या!’’ त्यानंतर अचानक त्या घरात दिवे लागले आणि परत एक-दोन क्षणांत अंधार झाला. तो जो कोण केशवराव असेल तो यावेळी कुठलं आणि कसलं पाऊल उचलण्याच्या बेतात होता? आणि दरडावणारा स्वर एका स्त्रीचा होता. एक खर होती त्या आवाजात. झोपेतून उठल्यावर जसा आपला आवाज असतो तसा. थोडा अस्पष्ट, दबकाही काहीसा. हल्ली काही स्त्री-लेखकांचा वादाच्या वेळी असा आवाज लागतो. ही घटना घडली तेव्हाही स्त्रिया लिहित्या झाल्या होत्या. पण असे आवाज नसायचे त्यांचे. स्त्रियांचा आवाज नैसर्गिकदृष्टय़ा मंजूळ असतो, तसेच त्या काळातल्या लेखिकांचे आवाज असायचे. मग ही अशा आवाजात त्या केशवरावला दटावणारी स्त्री म्हणजे काळाच्या आधी जन्माला आलेली एखादी लेखिका तर नव्हती? केशवराव हा नुसता केशव म्हणून जन्माला आला असणार आणि मग तो ‘राव’ झाला असणार. याचा अर्थ त्याने काहीतरी कामगिरी करून ‘राव’ ही पदवी संपादन केली असणार. आणि अशी चांगली कामगिरी करूनही आज त्याला- त्याने उचललेल्या किंवा उचलणार असलेल्या एका पावलाबद्दल- आवाजात खर असलेल्या स्त्रीकडून दटावून घ्यावं लागलं; म्हणजे त्याच्या आजपर्यंतच्या सगळ्या कामगिरीवर त्या एका भावी उचलल्या जाणाऱ्या एकमेव पावलाने काळिमा फासला जाणार आहे असा निष्कर्ष त्या स्त्री-स्वरातून आलेल्या शब्दांवरून सहज काढला तर ते फार वावगं ठरणार नाही.

पण मग प्रश्न उरतो तो असा की, असं काय पाऊल उचललं जाणार होतं? आणि मुळात त्या पाऊल उचलण्याचा मनसुबा रचणाऱ्या केशवरावाचा आणि ते उचललं जाण्यापासून त्याला रोखणाऱ्या त्या स्त्रीचा परस्पर नातेसंबंध काय होता? कोण होती ती स्त्री? त्याची पत्नी? आई? बहीण? काकू? वा इतर कोणी नातेवाईक? ते उचललं जाणारं पाऊल आणि त्याने जो काही अर्थ वा अनर्थ ओढवणार होता त्याबद्दल काळजी वाटून इतक्या रात्री सावध होणारी आणि त्या केशवरावला खबरदार करणारी त्याची आई असू शकत होती? कदाचित असावी. कारण मूल कितीही मोठं झालं तरी त्याची आई कायम त्याच्यापेक्षा मोठीच असते. पण मग प्रश्न असा निर्माण होतो की, आपला मुलगा ‘राव’ ही पदवी लावण्याइतका कर्तबगार झाला तरीही आज त्याला हे असं पाऊल उचलावं असं वाटेपर्यंत त्याच्या आईला त्याच्या कृत्याची चाहूलही लागली नाही, इतकी ती केशवरावबद्दल बेफिकीर राहिली?

समजा, ती स्त्री त्याची काकू असेल किंवा आत्या.. तर? तर- याचा अर्थ असाही निघू शकतो, की केशवरावला त्याची आई लहानपणी सोडून गेली असेल. एकतर देवाघरी, किंवा अशीच सोडून दुसऱ्या कुणाचा हात धरून ती पळून गेली असेल. आणि मग काकू किंवा आत्याने त्याचं संगोपन केलं असेल. पण मग आई का सोडून गेली असेल? ती देवाघरी गेली असेल तर त्या गावातल्या वैद्यकीय सुविधांचा प्रश्न ऐरणीवर येऊ  शकतो. कधी सुधारणा होणार त्यात? आणि जर आई कुणाचा हात धरून पळून गेली असेल तर मग त्यासंदर्भात केशवरावच्या वडिलांचा भूतकाळ तपासावा लागेल. वडिलांचा किंवा आईचाही. ‘स्त्रिय:श्चरित्रम खलु न जानती’ या उक्तीनुसार त्याची आई अशी का वागली असेल हे कुणालाच पटकन् सांगता येणार नाही. की केशवरावचे वडील बाहेरख्याली असतील आणि त्याला विटून त्याची आई निघून गेली असेल? आणि आता वयाने मोठा झालेला केशवरावही ‘वळणाचे पाणी वळणाला जाते’ या दुसऱ्या उक्तीनुसार वडिलांच्याच मार्गाने निघण्याच्या विचाराने पाऊल उचलण्याच्या मार्गावर असताना त्याच्या आत्या किंवा काकूला गतकाळाची आठवण येऊन त्या तसल्या मार्गाचा परिणाम काय होतो ते ध्यानात आल्याने आज ती शेवटी जिवाचा हिय्या करून केशवरावला सावध करत असेल?

म्हणजे याचा अर्थ असाही होतो, की केशवराव हा लग्न झालेला कुटुंबवत्सल गृहस्थ आहे. मग त्याच्या बायकोचे याबाबत काय म्हणणे असेल? तिच्या आयुष्याचा कौटुंबिक पट उधळून जात असताना ती काहीच का बोलत नाहीये? की त्याच्या आईप्रमाणेच आता त्याची बायकोही त्याला सोडून जाणार आहे..? आणि याचा सुगावा लागल्याने तो तिच्या जिवाचं काहीतरी बरं-वाईट करायच्या विचाराने एखादं हत्यार घेऊन ऐन रात्री तिच्या खुनाचा प्रयत्न करायच्या बेतात असतानाच काकू किंवा आत्याला जाग येऊन ती त्याला परावृत्त करण्याचा विफल किंवा सफल प्रयत्न करायच्या मागे आहे? किंवा असं तर नसेल, की केशवरावची बायको मुकी आहे आणि तिला काहीच बोलता येत नसल्याने ती बिचारी गरीब गाय आपल्या सासूच्या माध्यमातून केशवरावची याचना करते आहे? मात्र, जर मुळातच बायकोचे हे व्यंग लपवून ठेवून तिचे कधीकाळी केशवरावशी लग्न लावून दिले गेले असेल आणि त्यानंतर केशवरावने अत्यंत समजूतदारपणा दाखवून आजपर्यंत सुखाचा संसार केला असेल, आणि आता त्याला आपल्या पत्नीबद्दल पराकोटीची प्रेमाची भावना निर्माण झाल्यामुळे तिचा खराखुरा जीवनसाथी बनण्यासाठी तो आपलीही जीभ कापून घ्यायला निघालाय आणि अचानक घरातल्या लोकांना जाग येऊन ते त्याला असं न करण्याबद्दल सावध करत आहेत?

हे सगळे विचार मनात कल्लोळ घालत असतानाच आमची नाटकाची बस परत निघायला सज्ज झाली आणि या सगळ्याचा उलगडा न झाल्याने आम्ही खिन्न अंत:करणाने आत जाऊन बसलो. या अशा नुसत्या पाण्यातून बासुंदी निर्माण करणाऱ्या कथा भरपूर वाचल्या आणि वाटलं, आपणही असं काहीतरी लिहावं. कधी कुठल्या केशवरावांच्या आयुष्यात असा प्रसंग घडून गेला असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.

sanjaydmone21@gmail.com